जालना प्रतिनिधी
रामकिशन अवधूत
जालना : दि. १ जुलै २०२६ जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात कोठाळा खु . येथे हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोठाळा खु. येथे कृषि विभाग, अंबड यांच्या वतीने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. *तालुका कृषि अधिकारी श्री. बाळासाहेब गंडे* यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात शेतकरी आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास सहाय्यक कृषि अधिकारी श्री. विजय जाधव, शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय सपकाळ, शिंदे सर, केकान सर, तसेच गावातील शेतकरी श्याम सगळे, अशोक गुळवणे, करण गुळवणे, सागर गुळवणे, अमोल शिंदे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विजय जाधव यांनी कृषि विभागाच्या विविध शेतकरी कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच सघन कापूस लागवड, गळफांदी व फळफांदी व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती, एकात्मिक पीक व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व इतर किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी कामगंध (फेरोमोन) सापळे, निळे व पिवळे चिकट सापळे वापरण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक टाळून पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण कार्याचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीची संकल्पना समजावून सांगण्यात आली. शेतकरी व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कृषी दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून आधुनिक शेतीचा संदेश गावागावांत पोहोचविण्याचा कृषि विभागाचा उद्देश यशस्वीपणे साध्य झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.







