निर्भिड आवाज न्युज दिपक गायकवाड सर (संपादक )
दि. ९ जुलै २०२६ पहिल्या भागात आपण चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या कार्यक्रमाची माहिती पाहिली. पण त्यात सवर्ण समाजाने शांततामय रितीने आपला समतापूरक न्यायहक्क बजावणा-या या कार्यक्रमास गालबोट लावले. यामुळे दंगा झाला व त्यात महार समाजाला मार पडला. याचे कारण म्हणजे सत्याग्रहाला आलेली तीन हजार अस्पृश्य जनता शांतपणे चारचारच्या रांगा करून चवदार तळ्यावर पाणी पिऊन आल्यावर जेवनास बसली. पण त्या अगोदर महाड गावच्या बापू गुरवाने गावात अशी दवंडी पिटली की , ‘ आता अस्पृश्यांनी चवदार तळे बाटवले आता ते वीरेश्वराचे मंदिरात जाऊन मंदिर बाटवणर आहेत. ‘ या बातमीने स्पृशांची माथे भडकली व त्यांनी जेवनास बसलेल्या जनतेवर हल्ला केला. त्यांच्यावर काठ्या टाकल्या. या हल्ल्यात बायका मुलांनाही सोडण्यात आले नाही. या अचानक घडलेल्या धुमश्चक्रीने पुरता समाज गांगरला. समाज सैरावैरा धावू लागला. आपला नेता अडचणीत येऊ नये म्हणून दोन हात करण्याचे त्याने टाळले. नाहीतर हातात काठी असतानाही त्याने ती उगारली नाही. जर तसे त्याने केले असते तर, त्याने महाडचे त्याच रात्री कोरेगाव केले असते. पण आपल्या नेत्याने हा सत्याग्रह शांततेने करण्याचे अगोदरच आपल्या भाषणात सांगितले असल्याने व कोणताही पूढील आदेश नसल्याने जनता मुकाट्याने सारे सहन करत राहिली. पार सनातन्यांनी अन्नात माती कालवली तरी त्यांनी आपला संयम सुटू दिला नाही. पण या संत्याग्रहातली गम्मत अशी की, अस्पृश्य हिंदू असूनही हिंदूच हिंदूंना मारत होते. तर परधर्मिय असतानाही मुस्लिम बंधू अस्पृश्यांना आपल्या घरात आसरा देऊन, त्यांना अन्न व त्यांच्या जखमेवर औषध लावून त्यांची बंधूभावाने सूश्रृषा करत होते. एवढेच नाही तर हा संपूर्ण रणसंग्राम पाहून व पोलिसांना व कलेक्टरला याविषयी जबाब देऊन, डॉ आंबेडकरांनी आम्हाला वीरेश्वराच्या म़दिरात जायचेच नव्हते व तो आमचा इरादाही नव्हता, असे सांगून हे प्रकरणच गुरवाने उपस्थित केले व आमच्या लोकांना मार पडला असते निक्षून सांगितले. यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना दूस-या दिवशी महाड मधील टेमपाला गावच्या अलिमिया काझी या मुस्लिम सभ्य गृहस्थाने आपल्या गाडीतून मुंबईला पोहच केले. यानंतर ब-याच वृत्तपत्रांनी या महाड सत्याग्रहाची दखल घेतली. पण यात संत्याग्रहाच्या माध्यमातून डॉ आंबेडकरांवर टीकास्त्र सोडणारेच मनूवादी जास्त होते. यात भालाकार भोपटकर आघाडीवर होते. तसेच कुलाबा समाचार, कैसर, चाबुकस्वार याही वृत्तपत्रांचे संपादक डॉ आंबेडकरांवर आगपाखड करतच होते व हे सारेच मनुवादी वत्तीतून लिहून डॉ आंबेडकरांनाच दोष देत होते. पण आंबेडकरांनी या सर्वांचाच खरपूस समाचार आपल्या ‘ बहिष्कृत भारत ‘ यातून शेलक्या शब्दात कोणाची भाडभीड न ठेवता घेतला. यात ‘ कैसर ‘ च्या संपादकाने अस्पृशांस निकराचा सवाल केला की, ” तुम्ही देऊळ किंवा पाणवठे बाटविण्याचा प्रयत्न एकदम बंद करा. तसे न केल्यास आम्ही तुमच्या पाठी सडकू.” यावर बाबासाहेबांनी स्पष्टपणे ‘ बहिष्कृत भारत ‘ मधून उत्तर दिले की, ” आम्ही आपला प्रयत्न केंव्हाच बंद करणार नाही, आमच्या पाठी जो सडकीन त्यांची आम्ही टाळकी सडकू ” एवढेच सांगून बाबासाहेब थांबले नाही. तर त्यांनी भालाकार भोपटकरांना हेंही निक्षून सांगितले की, ” आज ना उद्या या प्रश्नाचा निकाल आम्ही करून घेणार आहोत. आम्हाला समाजात समान हक्क पाहिजे आहेत. ते आम्ही शक्यतोवर हिंदूसमाजात राहून आणि जरूर तर कवडीमोल ठरलेल्या हिंदूत्वावर लाथ मारून मिळवणार आहोत आणि हिंदूत्वावर पाणी सोडायची वेळ आली तर अर्थातच आम्ही देवळांच्या वाटेला जाणार नाही. ” बाबासाहेबांच्या त्यावेळच्या या म्हणण्यातच १९५६ च्या धर्मांतराचे मूळ सापडते हे विशेष. कारण बाबासाहेब हे नेहमी आपल्या वकीली पद्धतीने चळवळीची दिशा ठरवत होते. जसे महाडचा चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा कार्यक्रम त्यांनी तो अगोदर जाहीर केला नव्हता. तर तो सत्याग्रहाची परिषद २० मार्चला संपत आल्यानंतर आयत्यावेळी अनंतराव चित्रे यांना त्यांच्या भाषणात तो जाहिर करायला सांगितले व त्यांनी तो केला. कारण परिषदे अगोदर जर तसे जाहिर केले असते तर तणाव वाढला असता व त्याचा परिणाम परिषदेवर झाला असता. यांचे भान बाबासाहेबांनी कायम ठेवलेले होते. हेच तत्त्व त्यांनी मनूस्मृती दहनाच्या वेळीही तंतोतंत पाळले. कारण अगोदर मननूस्मृतीचे काही पानेच जाळायची असे सांगून सरतेशेवटी संपूर्ण मनूस्मृतीच जाळली. खरे तर डॉ आंबेडकरांच्या मनात मनूस्मृती जाळण्याचा सुरवातीला कोणताच विचार नव्हता. याला कारण स्पृश्य मंडळीच कारणीभूत ठरली. महाडच्या स्पृश्य मंळींनी दहा बारा दिवसांनी चवदार तळ्याचे एक हजार घागरी पाणी बाहेर काढून, त्यात गोमूत्र व गाईचे शेण एकत्रित करून वैदिक पद्धतीने शुद्धीकरण केले. याचा भ़यंकर राग आंबेडकरांना आला. गाईची विष्ठा व मूत्र पाण्यात टाकून पाणी कधी शुद्ध होते का? हा त्यांना पडलेला प्रश्न होता. म्हणजे गाईच्या विष्ठा व मूत्रापेक्षाही महार समाज नीच आहे, यांची त्यांना भयंकर चीड आली व त्यांनी याला प्रत्युत्तर म्हणून दूस-या महाड सत्याग्रहाचा निर्णय घेतला. त्याची जोरदार तयारी सुरू केली. आपले सारे कार्यकर्ते कामाला लावले. समाज प्रबोधनासाठी त्यांनी आपल्या ‘ बहिष्कृत भारत ‘ मधून महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी ( २२/४/१९२७ ), महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी ( ६/५/२७), महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी ( २०/५/२७ ), अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी ( २५/११/२७ ), अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया (२३/१२/२७ ) असे पाच विद्वत्तापूर्ण लेख लिहिले. यामुळे महार समाजाला सत्याग्रहाचे महत्व कळाले व बहिष्कृत भारत पेपर महारवाड्यातून सामुहिकपणे ग्रंथासारखा वाचला जावू लागला. एवढेच नाहीतर गावोगावच्या पेपर वाचनाला माणसे किर्तनाला जावे याप्रमाणे जमू लागली. यामुळे महार समाजाच्या मनाची व मेंदूची हिंमत वाढली व या मनूस्मृती दहन सत्याग्रहाला दहा हजारांच्यावर जनता जमा झाली. महाड गावकऱ्यांचे आव्हान स्वीकारून महार जनता या सत्याग्रहाला आली होती. तिपण अशी तशी नाहीतर शीर तळहातावर घेऊन व बायकोचे कुंकू पूसून मारू किंवा मरू या इराद्याने आलेली होती. एवढेच नाही तर, कित्येकांनी यायच्या आदल्या दिवशी घरोघरी सणवार करून व कुल दैवतांना साकडे घालून मरण्यासाठीच आलेली होती. यामुळे दहा हजार महार वीरांच्या साक्षीने २५ डिसेंबर १९२७ ला मनूस्मृतीला आग लागली. पण या सत्याग्रहाची डॉ आंबेडकरांनी इतकी चातुर्यपुर्णपणे आखणी केलीय होती की, याचवेळी त्यांनी एक सैनिकदल स्थापन केले होते. यालाच सुरवातीला ‘ डॉ.आंबेडकर सेनादल ‘ असे म्हटले जात होते. यालाच पूढे ‘ समता सैनिक दल ‘ हे नाव देण्यात आले.






