जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
जालना : दि. ५ जुलै २०२६ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री गुरुदेव सेवा आश्रम, वडीगोद्री येथे दिनांक ५ जुलै २०२६ रोजी श्री गुरुदेव विद्या मंदिर शाळेच्या सन २००६-०७ च्या माजी विद्यार्थी बॅचच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर आश्रमातील अमोल सालोडकर गुरुजी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या सन्मानार्थ मैत्रीपर गीत सादर करून वातावरण उत्साहपूर्ण केले.
यानंतर ज्ञानेश्वर गिरी (सायबर अभ्यासक), सुदेश चव्हाण आणि ज्ञानेश्वर तावरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक मूल्ये, शिस्त, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, स्पर्धात्मक युगातील संधी आणि व्यक्तिमत्त्व विकास यांवर भर द्यावा, असे आवाहन केले. तसेच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करत भविष्यातही अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.
मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांना रजिस्टर, पेन बॉक्स, वह्या, फरसाण पुडे तसेच बिस्कीट पुड्यांचे वितरण करण्यात आले. रवींद्र खोमणे, योगेश सुरासे, तेजस हर्षे, लखन भोसले आणि सचिन सकुंडे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सन २००६-०७ च्या बॅचमधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.






