महेंद्र गोदाम
अंबाजोगाई प्रतिनिधी
अंबाजोगाई : दि. ११ सप्टेंबर २०२६ काळाच्या पडद्याआड गेलेल्या इतिहासाची पाने जेव्हा उलगडतात, तेव्हा जुन्या आठवणींसोबतच संघर्षाला आणि अस्मितेला एक नवी ताकद मिळते! मराठा आरक्षणाच्या पेटत्या लढ्याला अभूतपूर्व बळ देणारा आणि गावखेड्यातील पिढ्यानपिढ्यांचा स्वाभिमान अधोरेखित करणारा एक अत्यंत अलौकिक व ऐतिहासिक क्षण आज घाटनांदूरच्या भूमीत साकारला आहे. ब्रिटिशकालीन धूळ खात पडलेल्या जुन्या महसुली दप्तराच्या गर्भातून तब्बल १०० वर्षांपूर्वीचा ‘कुणबी’ वारसा पुन्हा एकदा लखलखत्या प्रकाशात आला आहे.
अंबाजोगाई उपविभागाचे कर्तव्यदक्ष आणि जनतेच्या प्रश्नांप्रती संवेदनशील असणारे उपविभागीय अधिकारी मा. दीपक वजाळे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली १० ते १७ सप्टेंबर दरम्यान घाटनांदूर ग्रामपंचायत येथे ‘मराठा-कुणबी नोंद पडताळणी’ शिबिराचा भव्य यज्ञ मांडण्यात आला आहे.
१९३२ च्या दप्तरातून गवसला हक्काचा पुरावा!
या विशेष शिबिरादरम्यान वरवटी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील प्रतिष्ठित पंढरीनाथ अंकुशराव काळे पाटील यांच्या घराण्याचा सन १९३२ चा मूळ ‘कुणबी’ उल्लेख असणारा ऐतिहासिक दस्तऐवज महसूल प्रशासनाला गवसला आहे. हा केवळ कागदाचा तुकडा नसून, काळे पाटील घराण्याने जपलेली कुणबी संस्कृती, परंपरा आणि रक्ताचा नाता अखंडपणे चालू असल्याचा तो एक जिवंत आणि अभेद्य पुरावा ठरला आहे. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या अत्यंत कडक कसोटीवर तपासून, प्रशासनाने या अमूल्य दस्तावेजावर अधिकृततेची मोहोर उमटवली आहे.
”शासनाच्या २ सप्टेंबर २०२५ च्या ऐतिहासिक निर्णयानुसार प्रशासन अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष आणि गतीने काम करत आहे. कोणत्याही नागरिकाचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले नाही. त्यामुळे समाजाने कोणत्याही अफवांवर अथवा गैरसमजांवर विश्वास न ठेवता शासकीय सूचनांचे पालन करावे आणि आपल्या हक्काच्या पुराव्यांचा लाभ घ्यावा.”
दीपक वजाळे (उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई)
प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी व मराठा बांधवांची अभूतपूर्व उपस्थिती
इतिहासाच्या या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तहसीलदार विलास तरंगे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, मंडळ अधिकारी मंजुषा घुगे मॅडम, अभ्यासू तलाठी – शिरसाट, बेकरे, चव्हाण, श्रीमती चव्हाण, बळवंत, घाटनांदूरचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष सरपंच महेश गारटे, ग्रामसेवक योगेश शेळके, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता काका जाधव व उपसरपंच पती, परिसरातील मान्यवर आणि असंख्य मराठा बांधव मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
घाटनांदूर येथील या ऐतिहासिक शिबिरामुळे केवळ एका घराण्यालाच नव्हे, तर वरवटीसह संपूर्ण परिसरातील शेकडो कुटुंबांना आपल्या हक्काची ओळख मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. प्रशासनाच्या या कौतुकास्पद उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




