20 ते 22 हजार लोकसंख्येच्या गावात बाजाराची जुनी परंपरा जिवंत, पण मोठा बाजार बंद पडल्याने शेतकऱ्यांची गैरसोय
महेंद्र गोदाम
अंबाजोगाई प्रतिनिधी
घाटनांदूर दि. १ नोव्हेंबर २०२६ अंबाजोगाई तालुक्यातील 20 ते 22 हजार लोकसंख्या असलेल्या घाटनांदूर गावात आजही बाजाराची परंपरा जिवंत आहे. गावातील मोंढा या ठिकाणी दर आठवड्याला शेळ्यांचा बाजार भरतो.
या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हातान्हात आलेल्या शेळ्या-मेंढ्या आणि व्यापाऱ्यांची मोठी सोय होते. याच कारणामुळे घाटनांदूरचा शेळी बाजार आजही तग धरून आहे आणि शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
मात्र, पूर्वी याच घाटनांदुर मध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या जनावरांचा बाजार – बैलजोडी, गाय, म्हैस, वासरू यांचा बाजार भरत होता. अंबाजोगाई, केज, अहमदपूर, परळी तालुक्यातून शेकडो शेतकरी बैलजोड्या घेऊन येत होते. लाखो रुपयांची उलाढाल व्हायची. काळाच्या ओघात हा मोठा बाजार बंद पडला आणि आता फक्त शेळी बाजारापुरताच मोंढा मर्यादित राहिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग 548 D वर असलेले घाटनांदूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. मोंढ्याची जागा मोठी आहे, पाण्याची सोय आहे, त्यामुळे प्रशासनाने थोडे लक्ष दिले तर मोठ्या जनावरांचा बाजार डबल सुरू होऊ शकतो.
शेतकऱ्यांचे म्हणणे :
“मोंढ्यात जागा आहे, पाणी आहे, फक्त प्रशासनाने परवानगी देऊन नियोजन करावे. मोठा बाजार सुरू झाला तर आम्हाला लातूर-परळी,किनगाव,मुरुड अंबाजोगाई जावे लागणार नाही. घाटनांदूरचा बाजार पुन्हा नावारूपाला येईल,” अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
ग्रामपंचायतीने यात लक्ष घालून घाटनांदूरच्या मोंढ्यात पुन्हा एकदा मोठ्या जनावरांचा बाजार सुरू करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.







