‘पांढऱ्या सोन्या’ला चांगला दर; दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कापूस उत्पादकांना दिलासा — साई आग्रो ट्रेडिंगचा शुभारंभ
रामकिसन अवधूत
जालना प्रतिनिधी :
जालना : दि. २२ ऑक्टोबर २०२६ यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने अंबड तालुक्यासह सुखापुरी परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून,त्याचा मोठा फटका खरीप पिकांना,विशेषतः कापूस उत्पादनाला बसला आहे.कमी पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असतानाच सुखापुरी येथे कापसाला प्रतिक्विंटल १० हजार ५१ रुपये असा दर मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
सुखापुरी येथे गुरुवार,दि. २२ ऑक्टोबर रोजी साई आग्रो ट्रेडिंगच्या कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.सुखापुरीचे सरपंच भगवानराव राखुंडे यांच्या हस्ते खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला.यावेळी साई आग्रो ट्रेडिंग चे मालक सतीश राखुंडे यांच्यासह परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.सामजिक कार्यकर्ते पत्रकर आदि मान्यवर उपस्थित होते.
खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी कापूस विक्रीसाठी घेऊन आलेले शेतकरी सर्जेराव गायकवाड यांचा रुमाल व टोपी घालून सत्कार करण्यात आला. त्यांच्या कापसाला प्रतिक्विंटल १० हजार ५१ रुपयांचा दर मिळाल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने कापूस पिकाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला.अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून,अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. त्यातच बियाणे,खते,औषध फवारणी,मजुरी तसेच इतर कृषी निविष्ठांच्या वाढत्या खर्चामुळे कापूस उत्पादनाचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे घटलेले उत्पादन आणि वाढलेला उत्पादन खर्च अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.अशा परिस्थितीत कापसाला मिळणारा चांगला बाजारभाव शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे.
शेतकऱ्यांच ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला १० हजार ५१ रुपयांचा दर मिळाल्याने सुखापुरी परिसरातील कापूस उत्पादकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. उत्पादन कमी झाले असले तरी चांगला दर मिळाल्यास नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यास मदत होईल,अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान,साई आग्रो ट्रेडिंगच्या माध्यमातून परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता राहावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य बाजारभाव मिळावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
दुष्काळाच्या झळा, उत्पादनातील घट आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी अडचणीत असताना कापसाला मिळालेला १० हजार ५१ रुपयांचा दर हा निश्चितच दिलासा देणारा ठरला आहे.मात्र,पुढील काळातही कापसाला समाधानकारक दर कायम राहणार का,याकडे परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.







