विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मंदिर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
बीड : दि. २ नोव्हेंबर २०२६ परळी वैजनाथ शहरातील फाउंडेशन शाळेजवळील मुख्य रस्त्यावर तसेच मंदिर दर्शनासाठी जाणाऱ्या प्रमुख मार्गावर रेती, खडी, विटा व इतर बांधकाम साहित्य टाकून करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. हे अतिक्रमण तात्काळ हटवून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका सौ. शिल्पा जयपाल लाहोटी यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
फाउंडेशन शाळेच्या परिसरातील या मुख्य रस्त्यावर दिवसभर दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावर शाळेत जाणारे विद्यार्थी, विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी येणाऱ्या माता-भगिनी, स्थानिक नागरिक तसेच मंदिरात दर्शनासाठी जाणारे असंख्य भाविक ये-जा करतात.
मात्र, रस्त्यावरच रेती, खडी, विटा व बांधकामाचे साहित्य टाकण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सार्वजनिक रस्ते हे नागरिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आहेत. कोणालाही रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे नगर परिषदेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठिकाणाची तात्काळ पाहणी करावी, रस्त्यावरील सर्व बांधकाम साहित्य हटवावे, तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका शिल्पा लाहोटी यांनी केली आहे.
तसेच भविष्यात अशा प्रकारचे अतिक्रमण पुन्हा होऊ नये, यासाठी नगर परिषदेने आवश्यक उपाययोजना करून शाळा परिसर आणि मंदिर दर्शनाच्या मार्गावरील वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता नगर परिषद प्रशासन या मागणीवर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.







