- सोशल मीडियावरील ऑडिओ क्लिपमुळे आंबेडकरी समाजात संताप
- भीमसैनिकांच्या दणक्यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात NCR नोंद
अंबाजोगाई (प्रतिनिधी, महेंद्र गोदाम) :-
अंबाजोगाई: दि. २२ ऑक्टोबर २०२६ श्रध्देय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व बदनामीकारक विधान केल्याच्या निषेधार्थ आज (दि. २२ऑक्टोबर २०२६) रोजी सकाळी ११:00 वाजता अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भीमसैनिकांच्या वतीने जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या दबावानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि. २१ ऑक्टोबर २०२६ ) फेसबुकवरील एका पेजवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये जातीय द्वेषातून बदनामीकारक वक्तव्य करण्यात आले होते. याप्रकारांमुळे आंबेडकरी समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून, समाजात तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन व NCR दाखल
या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज सकाळी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या संख्येने भीमसैनिक शांततेत बसून ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. यात महिला भीमसैनिकांचाही मोठा सहभाग होता.
भीमसैनिकांनी दिलेल्या कडक तक्रारीनंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात NCR क्र. 0502/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 356(2) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कठोर कारवाईची मागणी
संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे. मात्र, अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई न झाल्यास याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी भीमसैनिकांनी दिला आहे.








