MH 44 U 4927 – हीच नंबरप्लेट ठरली मूक साक्षीदार; हिट अँड रन करणाऱ्या नराधमाचा पोलीस शोध घेत आहेत
महेंद्र गोदाम
अंबाजोगाई प्रतिनिधी
घाटनांदूर : दि. ३१ ऑक्टोबर २०२६ अहमदपूर – अंबाजोगाई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 D वर अपघातांचे सत्र काही केल्या थांबेना. घाटनांदूर येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मेश्वर महादेव मंदिराच्या साक्षीने एका निष्पाप संसारावर काळाने घाला घातला. शनिवारी (दि. 31) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तळणी येथील एका 36 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने अवघ्या तळणी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळणी येथील रहिवासी शाम मोहन गित्ते (वय 36 वर्षे) हे आपली मोटारसायकल क्रमांक MH 44 L 5841 वरून तळणीकडे जात होते. ते घाटनांदूरच्या लक्ष्मेश्वर मंदिराच्या अलीकडे आले असता, समोरून येणाऱ्या एका अनोळखी भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, शाम गित्ते हे रक्ताच्या थारोळ्यात जागीच गतप्राण झाले, तर त्यांची दुचाकीही चक्काचूर झाली.
अपघाताची माहिती मिळताच घाटनांदूरच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत अपघात करून आरोपी चालक आपले वाहन घेऊन पसार झाला.
*घटनास्थळी महत्त्वाचा पुरावा
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, तेथे MH 44 U 4827 या क्रमांकाची एक पिवळी नंबरप्लेट पडलेली आढळून आली. ही नंबरप्लेट अपघात करून पळून गेलेल्या वाहनाचीच असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या एकाच तुकड्याच्या आधारे आता आरोपी वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. ती तुटलेली पाटीच आता या अपघाताची मूक साक्षीदार बनली आहे.
कुटुंबाचा आधार हरपला,चिमुकल्यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले शाम गित्ते हे अत्यंत मनमिळावू आणि कष्टाळू तरुण म्हणून तळणी परिसरात परिचित होते. कधी कोणाला दुखावले नाही, आपल्या कष्टावर कुटुंबाचा डोलारा सांभाळणारा हा तरुण आज काळाने हिरावून नेला. त्यांच्या अकाली निधनाने गित्ते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मयत शाम गित्ते यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने पत्नीच्या आक्रोशाने आणि चिमुकल्यांच्या टाहोने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.
आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे लक्ष्मेश्वर मंदिर परिसरात वेग नियंत्रक आणि गतिरोधक बसवण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. अन्यथा हा मृत्यूचा महामार्ग आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.







