माणसांची तहान भागविताना डोमेगावातील शेळके दाम्पत्याची वृक्ष वाचविण्यासाठीही आटापिटा ; पाणीटंचाईने पर्यावरणप्रेमी चिंतेत
जालना प्रतिनिधी
रामकिशन अवधूत
जालना : दि. २२ ऑक्टोबर २०२६ घर तेथे शौचालय’ हा उपक्रम स्वतःच्या पदरमोडीतून राबविणारे बाबासाहेब शेळके व सविता शेळके यांनी ‘एक व्यक्ती,एक झाड’ या संकल्पनेतून वृक्षलागवड करून त्यांचे लेकराप्रमाणे संगोपन केले.मात्र,सध्या निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे त्यांनी जिवापाड जपलेले झाड डोळ्यांदेखत सुकू लागल्याने पर्यावरणप्रेमींची चिंता वाढली आहे.
बाबासाहेब शेळके व सविता शेळके यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून ‘घर तेथे शौचालय’ हा उपक्रम राबविला.त्याचबरोबर वृक्षलागवड करून केवळ झाड लावण्यापुरते मर्यादित न राहता त्याचे लेकराप्रमाणे संगोपन केले.मात्र,आज पाण्याच्या भीषण टंचाईमुळे या झाडाला जगविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
डोमेगावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
डोमेगावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर उपाय म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.टँकरमधील पाणी पाणीपुरवठ्याच्या विहिरीत टाकून नळाद्वारे गावकऱ्यांना पुरविले जात आहे.ज्या नागरिकांकडे नळजोडणी नाही,त्यांच्यासाठी टँकर घरासमोर थांबवून ड्रममध्ये पाणी भरण्याची व्यवस्था केली जात आहे.
याचवेळी घरासमोरील झाडांची तहान भागविण्यासाठीही नागरिकांकडून शक्य तेवढे पाणी दिले जात आहे.घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या मर्यादित पाण्यातून थोडेफार पाणी झाडांना देत त्यांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
माणसांप्रमाणे झाडांनाही पाण्याची आस!
एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू असताना दुसरीकडे वर्षभर लेकराप्रमाणे जपलेले झाड पाण्याअभावी सुकताना पाहण्याची वेळ शेळके दाम्पत्यावर आली आहे. वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचा आदर्श घालून देणाऱ्या या दाम्पत्याची झाडाविषयीची तळमळ पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करते.
झाड लावणे महत्त्वाचे, पण ते जगविणे त्याहून महत्त्वाचे! डोमेगावातील ही परिस्थिती पाणीटंचाईचे गांभीर्य अधोरेखित करत असून, माणसांसोबतच वृक्षांचे अस्तित्व टिकविण्यासाठीही पाण्याचे योग्य नियोजन आणि वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त होत आहे.







