परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात पार पडलेल्या युवक महोत्सवात उत्कृष्ट संघाचे पारितोषिक रताना पाठीमागे उभे (डावीकडून) डॉक्टर कैलास अंभोरे प्राचार्य भारतराव खंदारे प्रमुख पाहुण्या कवयित्री गुंजन पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रवीण वक्ते ,
संस्थेचे अध्यक्ष श्रीमती आशाताई अकात संस्थेचे सचिव कपिल भैया आकात प्राचार्य सुधाकर जाधव व सर्व प्राध्यापक व विद्यार्थी

मंठा प्रतिनिधी
भीमचंद्र प्रधान
मंठा : दि. ११ सप्टेंबर २०२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ, परतुर संचलित लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, परतूर व स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 आणि 8 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित 2 दिवसीय जिल्हा युवा महोत्सवात स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, मंठाने आपल्या दर्जेदार कलाविष्काराने उल्लेखनीय यश संपादन केले. महाविद्यालयास संगीत विभागातून ‘उत्कृष्ट संघ’ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला.
या महोत्सवामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विशेषतः संगीत व व ललितकला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.
महाविद्यालयाने विविध कला प्रकारांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले. त्यामध्ये शोभायात्रा (पूर्ण संघ) या प्रकारात महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय शास्त्रीय गायन या प्रकारात पूजा कुलाल हिने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच पाश्चात्य गायन या प्रकारात समृद्धी गायकवाड हिने प्रथम क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली.
भारतीय सुगम गायन या प्रकारात पूजा कुलाल हिने द्वितीय क्रमांक मिळविला. पोस्टर स्पर्धेमध्ये कु ज्योती अंभोरे या विद्यार्थिनी द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच भारतीय समूह गायन या प्रकारात पूजा कुलाल, संस्कृती घारे, भाग्यश्री डहाळे व श्रुती पांचाळ या विद्यार्थिनींच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे उल्लेखनीय यश अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सरावाला, मेहनतीला आणि मार्गदर्शकांच्या योग्य दिशादर्शनाला या यशाचे श्रेय जाते.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रा. डॉ. सुधाकर जाधव, सांस्कृतिक विभाग समन्वयक तथा संघप्रमुख प्रा. डॉ. दक्षता देशमुख, संघप्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र काकडे, प्रा. डॉ. तुषार धोंडगे, प्रा. डॉ. संतोष वानखेडे, प्रा. डॉ. भरत धोत्रे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
सांस्कृतिक विभाग आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी जिल्हा युवा महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या उपलब्ध झालेल्या व्यासपीठावरून आपले कलाविष्कार सिद्ध केले आणि महाविद्यालयाच्या नाव लौकिकात भर घातली.




