दुष्काळग्रस्त बळीराजाच्या पाठीशी उभे राहत सत्ताधाऱ्यांवर सोडले टीकास्त्र
अंबाजोगाई / महेंद्र गोदाम (प्रतिनिधी):
दि. २० सप्टेंबर २०२६ अंबाजोगाई तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर हजर तर दुसरीकडे दुष्काळाच्या आढावा बैठकांमध्ये बंद खोलीत काजू-बदाम खाण्यात मग्न असलेले शासन-प्रशासन आणि स्वतःचे वाढदिवस साजरे करण्यात गुंग असलेले नेते; तर दुसरीकडे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणारा आणि धीर देणारा जनतेच्या मनातील विरोधी पक्षनेता! हेच विदारक वास्तव आज बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी व घाटनांदूर परिसर आणि संपूर्ण मराठवाड्यात पाहायला मिळाले. एका बाजूला बळीराजा महाभयंकर संकटात असताना सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे अश्रू आणि कामगारांचे कष्ट कसे दिसत नाहीत, असा संतापजनक सवाल आता उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहितदादा पवार हे सध्या मराठवाडा दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी येथे भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला.
पाण्याअभावी डोळ्यांदेखत वाळून जाणारी पिके, पाण्यासाठी सुरू असलेली वणवण आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी… दगडवाडीतील ही भीषण आणि संवेदनशील परिस्थिती पाहून उपस्थितांचे मन सुन्न झाले. हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे. एकीकडे सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला ठेवून नेते आपल्या सोहळ्यांमध्ये आणि वाढदिवसाच्या जल्लोषात व्यस्त असताना, आमदार रोहित पवारांनी मात्र थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे सांत्वन केले आणि त्यांना भक्कम आधार दिला.
दगडवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर आमदार रोहित पवार हे पुढील दौऱ्यासाठी अहमदपूरकडे रवाना झाले. अहमदपूरकडे जात असताना वाटेत घाटनांदूर येथे स्थानिक शेतकरी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा थांबवून भेट घेतली. यावेळी घाटनांदूर येथील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील करपून गेलेले सोयाबीनचे पीक हातात घेऊन आपली आपबीती मांडली. पेरणीच्या वेळी मोठा खर्च करून बियाणे, खत टाकले, मात्र पावसाने ओढ दिल्याने आणि कडक उन्हामुळे संपूर्ण पीक जळून खाक झाले आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली. यावेळी घाटनांदूरच्या ग्रामस्थांनी सोमेश्वर ग्रामदेवतेची प्रतिमा देऊन आमदार पवारांचा सत्कार केला.
आमदार रोहित पवार यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या व दिलेला इशारा:
तातडीने अधिकृत दुष्काळ जाहीर करा: परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विलंब न करता संपूर्ण परिसरात अधिकृत दुष्काळ जाहीर करण्यात यावा.
तातडीने पंचनामे व भरपाई: सर्व जाचक निकष बाजूला ठेवून शेतीपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि पीक विम्यासह नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
कर्जमाफी व बिनव्याजी कर्ज: शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देऊन पुढील हंगामासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे.
युद्धपातळीवर उपाययोजना: पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि कामगारांसाठी रोजगाराची साधने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे.
”अधिवेशनात जाब विचारणार, २४ तारखेला शेतकरी मोर्चा!” – रोहित पवार
या प्रसंगी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, “दुष्काळाची खरी तीव्रता वातानुकूलित कक्षात बसून, वाढदिवस साजरे करून किंवा शासकीय आकडेवारीतून कधीच समजणार नाही. त्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्याच्या डोळ्यांतील वेदना आणि कामगारांचे कष्ट पाहावे लागतात. आज सरकार बैठका आणि सोहळ्यांमध्ये मग्न आहे, पण आमचा शेतकरी व कष्टकरी इथे उघड्यावर पडला आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुमच्या बांधावर येऊन तुमची व्यथा समजून घेणे हे माझे कर्तव्य आहे. हा सर्व विषय मी आगामी अधिवेशनात लावून धरणार असून सरकारला जाब विचारणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीसाठी येत्या २४ तारखेला सकाळी १० वाजता बीडमध्ये आणि संध्याकाळी ४ वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही भव्य शेतकरी मोर्चा काढणार आहोत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
या संपूर्ण पाहणी दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, युवक अध्यक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी आमदार संदीप भैया शिरसागर राजेसाहेब देशमुख,राजूभाऊ फड,पृथ्वीराज साठे, राजकमल देशमुख, धनंजय जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष मुक्तार शेख, बाळासाहेब देशमुख ,मच्छिंद्र वालेकर ,बालाजी राजमाने,कमलाकर मिसाळ ,पत्रकार महेंद्र गोदाम गावातील इतर नागरिक शेतकरी व पक्षाचे पदाधिकारी घाटनांदूर येथील शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




