जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
जालना : दि. ३ जुलै २०२६ अंबड तालुक्यातील गेवराईनगर परिसरात घडलेल्या धक्कादायक कार चोरीच्या घटनेचा उलगडा अवघ्या सहा तासांत करण्यात गोंदि पोलिसांना यश आले आहे. हॉटेल संगम येथून गाडीमालकास मारहाण करून स्विफ्ट डिझायर कार व इतर साहित्य चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे.
दि. 02 जुलै 2026 रोजी रात्री ही घटना घडली होती. चोरट्यांनी गाडीमालकास मारहाण करून त्याची स्विफ्ट डिझायर कार जबरदस्तीने पळवून नेली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा . श्री . तेगबीर सिंह संधू, पोलीस अधीक्षक, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेली स्विफ्ट डिझायर कार, गुन्ह्यात वापरण्यात आलेली आय-20 कार, तसेच एक लोखंडी तलवार, गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी गु.र.नं. 199/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता व शस्त्र अधिनियमातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
आकाश नाना त्रिभुवन (वय 27), रा. छत्रपती संभाजीनगर
पवन प्रकाश मिरजकर (वय 30), रा. फिरोजराजा, छत्रपती संभाजीनगर
ही संपूर्ण कारवाई तेगबीर सिंह संधू, पोलीस अधीक्षक, जालना आणि विक्रम साळी, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गोंदी येथील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
अवघ्या सहा तासांत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना जेरबंद करण्यात आल्याने पोलिसांच्या तत्परतेचे व कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.




