जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
जालना : दि. ७ जुलै २०२६ अंबड तालुक्यातील मौजे घुंगर्डे हदगाव येथील गट क्र. २५५ मधील शेतीच्या ताब्याचा व रोजगाराचा प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी हेमाताई हनुमंत वाघमारे रा . गोंदि (भाग्यनगर )यांनी आपल्या कुटुंबासह सोमवार (दि. ६ जुलै २०२६) सकाळी ९ वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, संबंधित शेतात उसाचे उभे पीक असल्याने पीक काढणी होईपर्यंत जमिनीचा ताबा दुसऱ्याला देऊ नये. तसेच भूमिहीन असल्यामुळे रोजगाराचा प्रश्नही तातडीने सोडवावा, अशी त्यांची मागणी आहे.
यासंदर्भात तलाठी व तहसीलदार, अंबड यांना लेखी निवेदन देण्यात आले असून, मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी हेमाताई वाघमारे व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.




