जालना प्रतिनिधी
रामकिशन अवधूत
जालना : दि. ३ जुलै २०२६ घनसावंगी आणि अंबड तालुक्यांमध्ये युरिया खताचा मोठ्या प्रमाणावर साठा उपलब्ध असतानाही काही दुकानदारांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. केवळ मर्जीतील शेतकऱ्यांनाच खत देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश तारगे यांनी जिल्हा परिषद जिल्हा कृषी अधिकारी श्री. पी. बी. बनसोडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
दोन्ही तालुक्यांत हजारो बॅग्ज उपलब्ध; तरीही शेतकऱ्यांची अडवणूक
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, काल रात्रीपर्यंत:
घनसावंगी तालुका: 68,000 युरिया खताच्या बॅग्ज शिल्लक आहेत.
अंबड तालुका: 58,000 युरिया खताच्या बॅग्ज शिल्लक आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठा उपलब्ध असतानाही दुकानदारांकडून शेतकऱ्यांना खत देण्यास टाळाटाळ केली जात आहे. हा सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय असून, खताचा काळाबाजार करण्यासाठीच ही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात
असल्याचा आरोप डॉ. तारगे यांनी केला आहे.
कुंभार पिंपळगाव येथे काळाबाजार उघड; आरोपींना तात्काळ अटकेची मागणी
खताच्या काळाबाजाराची बाब कृषी विभागाच्याही निदर्शनास आली असून, नुकताच कुंभार पिंपळगाव येथे बेकायदेशीरपणे विक्री केला जाणारा युरिया खताचा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. या कारवाईचे स्वागत करत, संबंधित आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी आणि इतरही गैरप्रकार करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई व्हावी,
अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रमुख मागण्या:
खत साठ्याचा फलक अनिवार्य करा: प्रत्येक खत दुकानदाराला आपल्या दुकानाबाहेर उपलब्ध असलेल्या खत साठ्याचा फलक (Stock Board) लावणे बंधनकारक करण्यात यावे.
दैनिक अपडेट्स जाहीर करा: अंबड आणि घनसावंगी तालुक्यांसह संपूर्ण जालना जिल्ह्यात रोज किती खत उपलब्ध आहे, याचे दैनंदिन अपडेट्स जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी प्रेस नोट द्वारे जाहीर करावेत. व त्याबाबत ग्राहक पंचायत जिल्हा जालना यांना देखील दररोज माहिती द्यावी
टाळाटाळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा: खत असूनही शेतकऱ्यांना नकार देणाऱ्या किंवा मर्जीतील लोकांनाच खत विकणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवून त्यांना हक्काचे खत वेळेवर मिळावे, यासाठी कृषी विभागाने आता प्रत्यक्ष मैदानात उतरून तपासणी करावी, असा इशाराही या प्रसंगी डॉ. रमेश तार्गे यांनी दिला आहे.




