जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
अंबड : दि. ०४ जुलै २०२६ सुखापूरी हे अंबड तालुक्यातील महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव असून सुखापूरी–तिर्थपूरी रोडवरून सध्या अवैध वाळू वाहतूक खुलेआम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः तिर्थपूरी कडून येणारे मोठे व छोटे हायवा पहाटेच्या वेळेत प्रचंड वेगाने धावतात. याकडे महसूल प्रशासनासह गोंदी पोलीस ठाणे यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
दररोज सकाळी पाच ते आठ या वेळेत या मार्गावर वाळू वाहतूक करणारे हायवा सुसाट वेगाने धावत असतात. याच वेळेत मोठ्या प्रमाणात नागरिक मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर उतरतात. यामध्ये पोलीस भरतीसाठी सराव करणारे विद्यार्थी, वयस्कर महिला, तसेच वृद्ध नागरिकांची संख्या मोठी आहे. लखमापुरी, सुखापूरी, कुक्कडगाव परिसरातील नागरिक याच रस्त्याचा वापर सकाळच्या वेळेत करतात.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना कोणाचाही धाक नसल्याचे चित्र असून, वाहनांचा वेग इतका जास्त असतो की रस्त्यावर असलेली जनावरेही त्यांच्या लक्षात येत नाहीत. आतापर्यंत सात ते आठ कुत्रे हायवाखाली येऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. “आज कुत्रे मेले, उद्या एखादा माणूस मरणार का?” अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
सध्या अंबडचे तहसीलदार नव्याने रुजू झाले असून त्यांच्या वचकाचा अभाव असल्याची चर्चा आहे. दरम्यान, गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मा. श्री. अमोल गुरले यांनी यापूर्वी दोन वाळू माफियांना स्थानबद्ध केले आहे. मात्र तिर्थपूरी ते अंबड रोडवर, विशेषतः सुखापूरी परिसरातून सुरू असलेली सुसाट वाळू वाहतूक अद्याप बंद झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर “या हायवांचा बंदोबस्त नेमका कधी होणार?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने कारवाई करून रस्त्यावर वेगमर्यादा लागू करावी, सकाळच्या वेळेत पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.





