
अंबाजोगाई प्रतिनिधी
महेंद्र गोदाम
अंबाजोगाई : दि. ०९ जुलै २०२६ अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर गावात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. आतापर्यंत १० ते १२ नागरिकांना या कुत्र्यांनी चावा घेतला असून त्यामध्ये महिला, पुरुष आणि वृद्धांचा समावेश आहे. सोबतच्या फोटोंमध्ये जखमींच्या हात-पायांना झालेल्या खोल जखमा स्पष्ट दिसत आहेत.
फोनवर कळवूनही कारवाई नाही
याबत गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सरपंचांशी फोनवर चर्चा करून तातडीने कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यांच्यासमोर २ महत्वाच्या मागण्या ठेवण्यात आल्या:
१. भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करावे
२. मेलेल्या पिसाळलेल्या कुत्र्यांना जेसीबीच्या साहाय्याने जमिनीत पुरण्यासाठी जेसीबी उपलब्ध करून द्यावी
मात्र फोनवर चर्चा होऊनही सरपंचांकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. उलट जेसीबी देण्यास नकार देत उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
नागरिकांचा संताप आणि इशारा
प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. लहान मुले शाळेत जाण्यास घाबरत आहेत.
जर तातडीने पिसाळलेल्या कुत्र्यांवर कारवाई झाली नाही, तर संतप्त नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर पिसाळले कुत्रे आणून बांधतील आणि ग्रामपंचायतला कुलूप ठोकतील असा इशारा देण्यात आला आहे.
गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासन, गटविकास अधिकारी आणि आरोग्य विभागाकडे तातडीने हस्तक्षेप करून भटक्या कुत्र्यांना पकडणे, जखमींना मोफत Anti-Rabies उपचार आणि लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.







