जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
जालना : दि ०९ जुलै २०२६ घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील मातंग समाजातील रुख्मिणबाई लोंढे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारण्याची घोषणा केली आहे. अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यभर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याने परिसरात या घोषणेची चर्चा सुरू झाली आहे.
रुख्मिणबाई लोंढे यांनी सांगितले की, त्या सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवून कार्य करत आहेत. त्यांच्या मते, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाजाला स्वाभिमान आणि अधिकारांची जाणीव करून दिली. त्यांच्या विचारांवर चालण्याचा आमचा निर्धार आहे.”
त्यांनी असा आरोप केला की, उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या समाजातील काही व्यक्तींनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली असून त्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कुटुंबासह निर्णय घेतला असून दि. १४ एप्रिल २०२७ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार असल्याची घोषणा केली.
यावेळी त्यांनी, “आमचा जन्म हिंदू धर्मात आणि मातंग समाजात झाला असला, तरी आमचा शेवट बौद्ध धम्मात होईल,” अशी भूमिका मांडली.
या घोषणेच्या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष मा. आयु. शिवाजीराव गाडेकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मा. आयु. सतीश (मामा) खरात, मा. आयु. सतीश पटेकर, मा. आयु. परमेश्वर खरात, ॲड. चाबुकस्वार, आयु. गाढे (चॅनल प्रमुख), यांनी रुखमीणताई यांचे स्वागत केले . आयु. दीपक लोंढे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
रुख्मिणबाई लोंढे यांनी सांगितले की, दि. १४ एप्रिल २०२७ रोजी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात त्या आपल्या कुटुंबासह बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारणार आहेत.







