
देवानंद गायकवाड यांच्याकडून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप
परळी / प्रतिनिधी
आरक्षणाचे जनक आणि लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मौजे जिरेवाडी येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून गावचे सामाजिक कार्यकर्ते देवानंद गायकवाड यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांनी शाहू महाराजांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यातील योगदानावर आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील शिक्षिका राबतवार मॅडम होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून रुक्मिणीताई जोंधळे, मिलिंद घाडगे, राजेश सरवदे, रवी भैया मुंडे आणि शालेय समितीचे अध्यक्ष माऊली कांदे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते देवानंद गायकवाड यांनी केले. त्यांनी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोंडीबा रोडे, शशिकांत रोडे, करण रोडे, विवेक गायकवाड या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी लोभाजी जोंधळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.






