लातूर प्रतिनिधी
लातूर : दि. २३ ऑगस्ट २०२६ महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात लातूर पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत तब्बल ५ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये १ लाख ८७ हजार २०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ, तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे ४ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी बलेनो कार जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे.
दि. २२ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईच्या अनुषंगाने वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी हाळी ते शिरूर ताजबंद मार्गावरून बलेनो कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन संबंधित रस्त्यावर सापळा रचला. काही वेळातच एमएच-०५-डीएच-५२६६ क्रमांकाची संशयित बलेनो कार तेथे आली. पोलिसांनी कार थांबवून चालकाला ताब्यात घेत झडती घेतली असता मागील सीटवर तसेच डिक्कीत पोत्यांमध्ये विमल पान मसाला आणि व्ही-१ सुगंधित तंबाखूच्या बॅगसह एकूण १ लाख ८७ हजार २०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य माल आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली अंदाजे ४ लाख रुपये किमतीची बलेनो कारही जप्त केली. या प्रकरणी मुबीन सिद्दिख सय्यद (वय २९, रा. दर्गापूर, अहमदपूर, ता. अहमदपूर, जि. लातूर) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात कलम १२३, २७४, २७५, २२३ बी.एन.एस. अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, मनोज खोसे, आनंद हल्लाळे व प्रविण कोळसुरे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या धंद्यातील संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.






