परळी वैजनाथ
प्रतिनिधी
परळी: दि. २५ ऑगस्ट २०२६ परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे खोडवासावरगाव येथील गोळीबाराला अनैतिक संबंधाची पार्श्वभूमी पोलिस तपासात समोर आली असून चुलत बहीण आणि भावातील अनैतिक संबंधातून आणि मुलीला कुटुंबाने पुण्यात पाठवल्याच्या रागातून पुतण्याने स्वतःच्याच काकाच्या कुटुंबावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्itयातील खोडवासावरगाव तांडा येथे उघडकीस आली आहे. या हल्ल्यात ७५ वर्षीय आजोबा जखमी झाले आहेत. ही घटना २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला मध्यरात्री दोन वाजता बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणी प्रकाश फुलसिंग जाधव (वय ५०, राहणार खोडवासावरगाव तांडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा पुतण्या परशुराम विद्याधर जाधव (वय २१, राहणार खोडवासावरगाव तांडा) याचे आणि प्रकाश यांच्या मुलीचे अनैतिक संबंध होते. काही वर्षांपूर्वी तो तिला पळवून घेऊन गेला होता. पोलिसांनी तिची सुटका करून तिला कुटुंबाच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर सुरक्षिततेसाठी कुटुंबाने मुलीला पुण्यात तिच्या भावाकडे पाठवले. शुक्रवारी सायंकाळी प्रकाश जाधव, त्यांची पत्नी आणि वडील घरासमोर बसलेले असताना परशुराम तिथे गावठी कट्टा घेऊन आला. जीव वाचवण्यासाठी कुटुंबाने घरात धाव घेत दरवाजा लावून घेतला. संतापलेल्या परशुरामने एक गोळी हवेत आणि दोन गोळ्या दरवाजावर झाडल्या. प्रकाश यांचे ७५ वर्षीय वडील फुलसिंग यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, परशुरामने त्यांच्यावरही गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या डोळ्याला चाटून गेल्याने ते जखमी झाले. मुलीला उद्या सकाळपर्यंत ताब्यात न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकीन, अशी धमकी देत तो पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर अधीक्षक चेतना तिडके आणि सहा. पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत आरोपी परशुराम याला गंगाखेड तालुक्यातील माखणी गावातून रात्री दोन वाजता अटक केली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंढके करत आहेत.






