नांदेड प्रतिनिधी
धम्मानंद कांबळे
पूज्य भंते मेताधम्मो यांची धम्मदेशना; पंचक्रोशीतील बौद्ध उपासक-उपासिकांची मोठी उपस्थिती
नांदेड : दि. २८ ऑगस्ट २०२६ गोरेगाव येथील तपोवन बुद्धभूमी येथे श्रावण पौर्णिमेनिमित्त धार्मिक व धम्ममय वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंचक्रोशीतील श्रद्धावान बौद्ध उपासक-उपासिका तसेच लहान बालक-बालिका मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक १० वाजता सूत्रपठण व आनापान ध्यानाने करण्यात आली. मनुष्याने शांत, सुखी आणि समाधानी जीवन जगावे, यासाठी भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्ममार्गाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.
यावेळी पूज्य भंते मेताधम्मो जी यांनी उपस्थितांना धम्मदेशना दिली. आपल्या धम्मदेशनेत त्यांनी भगवान बुद्धांचा शांती, करुणा, मैत्री आणि सदाचाराचा मार्ग आचरणात आणण्याचे आवाहन केले. मनातील अशांतता दूर करून सुखी व शांत जीवन जगण्यासाठी धम्माचे आचरण आणि आनापान ध्यानाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे तपोवन बुद्धभूमी परिसरात दिवसभर धम्ममय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. महिलांसह पुरुष, युवक तसेच लहान बालक-बालिकांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
धम्मदेशनेनंतर उपस्थित श्रद्धावानांसाठी भोजदानाचे आयोजन करण्यात आले. सर्वांनी एकत्रितपणे भोजनदानाचा लाभ घेतला.
पंचक्रोशीतील बौद्ध समाजाने मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभाग नोंदवत श्रावण पौर्णिमा कार्यक्रम यशस्वी केला. भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रसार, धम्माचे आचरण आणि समाजामध्ये मैत्री, बंधुभाव व शांततेची भावना वाढीस लागावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.






