दिपक गायकवाड
संपादक निर्भीड न्यूज
नाशिक : दि.२६ ऑगस्ट २०२६ नाशिक जिल्ह्यातील एकलहरे गावात आदिवासीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलहरे विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मा.चव्हाण साहेब हे होते. तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक विचारवंत व व्याख्याते मा. दिपक गायकवाडसर हे होते.
आपल्या व्याख्यानात बोलताना व्याख्याते मा. दिपक गायकवाड म्हणाले की, आदिवासी समाज हा या भारतीय मातीचा मूळ वंश असून याच वंशाच्या रक्तातील डीएनए हे सर्वच मूळभारतीयांच्या रक्तात मिळालेले आहेत. भले मूळभारतीय हे आज कोणत्याही जात व धर्मात विभागलेले असले तरी त्यांची मूळ वांशिक नाळ हि आदिवासी समाजाशीच जूळलेली आहे हे प्रथमतः प्रत्येकाने समजून घ्यावे. तसेच या आदिवासी समाजाचे भारताच्या सामाजिक व धार्मिक जडणघडणीत सुरवातीपासूनच योगदान आहे. कारण हिंदू धर्माचे रामायण लिहाणारा योगपुरूष वाल्मिकी हे कोळी आदिवासी समाजाचे महाकवी असून, त्यांनीच रामाला युगानुयुगे जन्माला घातले. तसेच आदिवासी समाज हा मूळचाच स्त्री संस्कृतीचा मूळ उदगाता व पाईक असून याच मत्स्यगंधा नावाच्या कोळणीच्या पोटी पराशरॠषी कडून व्यासाचा जन्म झाला. तेंव्हा महाभारताचे रचनाकार व्यास हे सुद्धा आदिवासींच्या स्त्री संस्कृतीनुसार आदिवासीच आहेत. यामुळे रामायण व महाभारत हे दोन्ही ग्रंथ हिंदू धर्माला देणारे पुत्र हे आदिवासी आहेत व यांच्या महाकाव्या मुळेच हिंदू धर्म आपले धर्मप्रणालीतले स्थान जगात आजपर्यंत टिकवून आहे. म्हणजेच थोडक्यात आदिवासींनीच रामायण व महाभारत हि महाकाव्ये म्हणजे आदिवासींनी हिंदू धर्माला दिलेली देणगी आहे. पण याच आदिवासी नावाच्या वांशिक बापाला त्याच्याच भूमीत पिढ्यानपिढ्या उपेक्षित व वंचित ठेवले जाते, हिच या देशातील सर्वातमोठी वांशिक व सांस्कृतिक शोकांतिका आहे.असेही दिपक गायकवाड म्हणाले. तसेच रामायणातील रावण हा आदिवासी आहे हे आता आदिवासींनीच नव्हे तर, संपूर्ण भारतीयांनी मान्य केलेले आहे. पण याच रावणाचे केवळ आदिवासी राजा व मूळभारतीयांचा वंशज म्हणून याच आदिवासी समाजाला कायम नामोहरम करण्यासाठी व त्यांचा दु:खावर मीठ चोळण्यासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक दस-याला रावणाचे दहण केले जाते. हा या भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील आदिवासींचा आपमान आहे. तशी सत्य परिस्थिती व इतिहास पाहिला तर रामायण हेच मूळात आदिवासी रावण व ब्राह्मण राम यांच्यातील युद्ध असून, तो आदिवासी व ब्राह्मण असा सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक संघर्ष आहे. तसाच तो सत्य विरुद्ध असत्य यांचाही संघर्ष आहे. हेही आपण आज समजून घेतले पाहिजे. असेही सरतेशेवटी व्याख्याते दिपक गायकवाड म्हणाले. या कार्यक्रमाला एकलहरे विद्युत काॅलनीतील सर्वच समाजघटकाचे कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सांगता करताना मा.करवंदे साहेब यांनी उपस्थितांचे व प्रमुख व्याख्यात्यांचे आभार मानले. यानंतर स्वादिष्ट भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.





