कल्याण प्रतिनिधी
प्रदीप जाधव
ठाणे : दि. २२ ऑगस्ट २०२६ रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी ठाणे रेल्वे पोलिसांकडून नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या मोहिमेद्वारे रेल्वे रूळ ओलांडणे धोकादायक असून, घरातील व्यक्ती आपली वाट पाहत आहेत, त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, असा संदेश नागरिकांना देण्यात येत आहे. रेल्वे रूळ ओलांडणे हा कायद्याने गुन्हा असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली.
‘नागरिकांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, याकरिता जागरूकता व जनजागृती मोहीम’ राबवून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असलेल्या पादचारी पूल, जिने व अधिकृत मार्गांचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.






