जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत सर
जालना : दि. २० जुलै २०२६ अंबड तालुक्यातील गोरेगाव याठिकाणी महान लोकशाहीर, साहित्यरत्न व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त डोमेगाव येथे एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत डोमेगावचे पाणीपुरवठा कर्मचारी बाबासाहेब शेळके यांनी स्वतःच्या ₹16,800 इतक्या स्वखर्चातून गल्लाटी नदीमध्ये बांधारा उभारून जलसंधारणास चालना देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला.
या उपक्रमामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून शेतकरी, जनावरे तसेच भूजल पुनर्भरणालाही मोठा फायदा होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजोपयोगी कार्य करून त्यांना अभिवादन करण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
या वेळी मा. सरपंच डॉ. अशोक संपतराव काळबांडे, उपसरपंच कल्पना रमेश सांगळे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब खांडेभराड, पोलीस पाटील नागनाथ गुलगे, माजी सरपंच बाबासाहेब काळबांडे, कोळी शिरसगाव सोसायटीचे चेअरमन शंकरराव हेमके तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेब शेळके यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, जलसंधारण ही काळाची गरज असून अशा लोकसहभागातून राबविण्यात येणारे उपक्रम ग्रामीण विकासाला नवी दिशा देतात, असे मत व्यक्त केले.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य व सामाजिक कार्यातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या स्मृतिदिनी समाजहिताचा हा उपक्रम राबवून त्यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात आले. डोमेगावातील हा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरत असून सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.





