निर्भिड आवाज न्युज दिपक गायकवाड (संपादक)
भारताला बुद्धांची ओळख काही नविन नाही. बुद्ध भारताच्या हृदयावर जसा कोरलेला आहे, तसाच तो भारताच्या दगडांवरही कोरलेला आहे. एवढेच काय भारताची माती सुद्धा बुद्धच बोलते. आजही भारताच्या मातीत बुद्ध सापडतो. तर याच बरोबर काहींना आपल्या दैवतांची जन्मभूमी स्थापित करण्यासाठी अयोध्या व द्वारका शोधावी लागत आहे व न सापडल्यास रामपुत्ताच्याच साकेत नगरीला अयोध्या असे नाव देऊन, रामपुत्ताचा राम व साकेतची अयोध्या करावी लागत आहे. एवढेच नाही तर आज बांधलेल्या अयोध्याच्या राममंदिराखाली बुद्ध विहार दडलेले आहे हा इतिहास दडवावा लागतो आहे. यावरून बुद्धांची महती भारतीय मातीसी नाळेप्रमाणे किती घट्ट जडलेली आहे, हे काही नव्याने सांगायला नको. इतकेच नाही तर रामायणाची व महाभारताची मूळातून निर्मिती हि सुद्धा बुद्धांच्या जातक कथांतूंनच झालेली आहे. हे आता जवळजवळ जगजाहीर झालेले आहे. यामुळे प्रबोधनकार ठाकरे यांच्या ” हिंदू धर्म हे बीनबुडाचे पिचलेले गाडगं ” या त्यांच्या म्हणण्याला व बोलण्याला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे. पण आज हिंदूत्वाने माणसे वेडे व मनोरूग्ण बनवण्याचा व त्यांचे बौद्धिक आणि सांस्कृतिक शोषण करण्याचा व आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा कारखानाच परकीय मनूवाद्यांनी काढल्यामुळे, माणसाच्या संशोधक वृत्तीचा -हास होऊन, त्यांची मती म्हणजेच बुद्धी भ्रष्ट झाली आहे. यामुळे तो इतिहासा बरोबरच आपल्या मानवतावादी सहिष्णू संस्कृतीलाही विसरला आहे. कारण एककाळ बुद्धांच्या ‘ बुद्धमं शरणं गच्छामी ‘ या जयघोषात प्रज्ञा जागृत ठेवून जीवन जगणारा माणूस, आज नको त्या देवदेवतांच्या भाकड कथेत तल्लीन होऊन आपले आयुष्य बरबाद करत आहे.
इंग्रज राजवटीत भारतात प्रबोधनाचे वारे वाहू लागल्याने भारतातून वर्णव्यवस्था जाते की काय असा समज भारतीयांचा झाला होता. तसे आता फक्त जाती राहिल्या असे भारतीय स्वातंत्र्याच्या संविधान निर्मिती नंतर भारतीयांना वाटूही लागले होते. पण याच काळात ब-याच शुद्र वर्णातल्या लोकांना इतरांप्रमाणेच संविधानिक अधिकार मिळाल्याने व जरा राजकीय सत्ता हाती लागल्याने त्यांना बौद्ध धर्मापेक्षा क्षत्रिय वर्ण जवळचा व स्वतःला उच्चभ्रू समजायला लायक वाटू लागला व त्यांनी तसा छ. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक मुद्दा पुढे करून तसे घोषित करायला सुरुवातही केली. पण हे करत असतानाही क्षत्रिय म्हटलेतरी ब्राम्हणी वर्णाच्या खालचे म्हणजे दोन नंबरचे गुलामच आहेत, हे त्यांच्या लक्षात आलेच नाही आणि आले तरी तसे त्यांनी दाखवलेही नाही. याला प्रतित्तोर म्हणून आणि क्षत्रियांची जिरवण्यासाठी व त्यांना शुद्रत्वाची जागा दाखवण्यासाठी क्षत्रियांचीच एकवीसवेळा हत्या करणाऱ्या भाकड कथेला पुनर्जीवित केले व परशूराम जयंतीला जन्म दिला. तसेच छ.शिवरायांच्या इतिहासात स्वतःची मते घूसवून तो इतिहास पार जेम्सलेनच्या वंशापर्यत नेला. तसेच छ.शिवराय ते कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांच्या क्षत्रियत्वाला जसा सरळ समोरासमोर विरोध केला तसा न करता, बदलत्या काळानुसार त्या समाज घटकाला व त्यांच्या मागणीला शह दिला. पण या लढाईतले विशेष म्हणजे स्वतःला क्षत्रिय समजणा-या समाज घटकाने हि लढाई विजयाच्या मार्गाने न लढता ती शुद्रत्वाच्या मानसिकतेने लढून पराजय संपादन केला. यामुळे त्यांना कुणबी जातीत परत ढकलून त्यांना त्यांचा शुद्र वर्ण सवलतींच्या नावाखाली देणे सोपे गेले. तसेच यांना परत नव्याने शुद्र वर्ण मिळाल्याने ते इतके हुरळून गेले की, आम्हाला फक्त शुद्रच ठेवू नका तर,आम्हाला संविधानिक दृष्ट्या ओबीसी वर्गात घालून पूर्ण शुद्रत्वाची कवचकुंडले बहाल करा अशी मागणी करायला त्यांनी सुरुवात केली. यामुळे ‘ काय होतास तू काय झालास तू ‘ अशी त्यांची अवस्था झाली. हे सर्व होण्याचे कारण म्हणजे, क्षत्रियत्वाचा दर्जा मागणा-यांना आपला मूळ वंश आजपर्यंत न समजणे हेच आहे. कारण भारतीय क्षत्रिय वर्णाचा मूळपूरुष व महापुरुष हा भ. गौतम बुद्ध आहे. गौतम बुद्ध हे क्षत्रिय घराण्याचे सुपुत्र होते. त्यांनी क्षत्रियांप्रमाणे व ब्राम्हणी गुलामा प्रमाणे हातात शस्त्र न घेता व माणसे मारून धारातिर्थी न पाडता तसेच कोणताही रक्तपात न करता, पडणा-यालाच समता व ममता या गुणांनी उचलून घेतले व त्यांच्यात प्रज्ञा व स्वाभिमान भरला. यामुळे जे जे क्षत्रिय बुद्धांच्या मार्गाने गेले ते करूणेचे स्वाभिमानी क्षत्रिय झाले. त्यांचा धम्म व ब्राम्हणी वर्णमालेतील क्षत्रिय यांचा धर्म हि एकाच मूळभारतीय वंशाची दोन टोके आहेत. यातील धम्माचा क्षत्रिय हा कोणाच्या मेंदूने, प्रज्ञेने व संस्कृतीने गुलाम नसून तो स्वतंत्र व स्वाभिमानी आहे. त्याने त्याचे गुलामीपण त्याला त्याच्या बापाने दिलेल्या बावीस प्रतिज्ञेतच जाळून टाकले. तर इतर क्षत्रिय अपमानाची गुलामी पिढ्यांनपिढ्या डोक्यावर वहात क्षत्रियत्वाची भीक दूस-याकडे मागत राहिले. पण ते क्षत्रियत्व त्यांना स्वाभिमान पूर्वक कधीच मिळवता आले नाही. कारण त्यांनी त्यांच्याच वंशाचा मूळ पुरूष सोडला व परकीय माणसांकडे क्षत्रियत्वाची भीक मागायला सुरुवात केली. खरे तर बुद्धाकडे जाणे म्हणजेबुद्धांचा धम्म स्विकारले असे मुळीच नाही . बुद्धांच्या मार्गाने जाणे म्हणजे गुलामी, अंधश्रद्धा, अज्ञान यांना सोडून प्रज्ञामय मार्गाने शुद्ध होणे आहे. या शुद्धतेसाठी व मुळ भारतीय बुद्धमय करण्यासाठी, पेरणी अगोदर शेतीची मशागत करावी तशी डॉ आंबेडकरांनी ‘ शुद्र पूर्वी कोण होते ‘ व ‘ अस्पृश्य मूळचे कोण? ‘ हे दोन ग्रंथ लिहिले होते. यात त्यांनी हे दोन्ही वर्ग पूर्वीचे क्षत्रिय आहेत असे नमूद केले होते. आता क्षत्रिय म्हणजे नेमके कोण? तर क्षत्रिय म्हणजे भारतीय क्षेत्राचे ( मातीचे ) वंशज होय. तेंव्हा आजही भारतातील जे जे स्वतःला क्षत्रिय समजतात ते ते सर्वच भारतीय मातीचे भूमीपुत्र असून, आर्य भारतात येण्या अगोदर पासूनचे मूळभारतीय आहेत. तेंव्हा सर्वच मूळभारतीय भूमीपुत्रांनी आपला क्षत्रिय मूळपुरूष व महायोद्धा समजून बुद्धांच्या मार्गावर चालणे गरजेचे आहे. असे आजच्या बदलत्या काळानुसार वागले तरच तुमचा क्षत्रियस्वाभिमान आणि भारतीय मातीची नाळ जीवंत रहाणार आहे. ज्यांना हे कळले किंवा त्यांच्या बापाने त्यांना समजून दिले तेच बुद्धाकडे गेले व शुद्ध झाले. पण ज्यांना बापच प्रज्ञावंत, बुद्धीमंत मिळाला नाही ते परकीयांचे गुलामच राहिले. म्हणून आज प्रत्येक समाजाला शुद्ध बीजाच्या बापाची गरज आहे. ती गरज भागली तरच फळे रसाळ गोमटी होतील व बुद्धाच्या मार्गावर येऊन आपले परिवर्तन करून घेऊन आपले व आपल्या पूढील पिढ्यांचे हित साधतील. नाहीतर अज्ञान, अंधश्रद्धा, बुवाबाजी, मंत्रतंत्र, गंडेदोरे, नवसयात्रा करत राहुन नरकाचे जीने जगतील व स्वर्गाचे स्वप्न पाहतच जगाचा निरोप घेतील. यात शंकाच नाही. विशेष म्हणजे बुद्ध हा जसा क्षत्रिय होता तसाच तो कुणबी होता. कारण बुद्धांच्या वडीलांच्या शेतात एकाचवेळी एक हजार नांगर चालायचे. त्यातल्या मध्यभागावरचा नांगर स्वतः शुद्धोधन राजा धरायचे. त्या शुद्धोधन राजाच्या नांगराचा फाळ हा सोन्याचा असायचा. यामुळे हि धरणी फक्त दोनच राजांनी सोन्याच्या नांगराने नांगरली आहे. त्यातले पहिले राजा शुद्धोदन व दुसरे राजा छ.शिवाजी महाराज होय. एवढेच नाही तर बुद्धांनाही पहिली संबोधी प्राप्ती याच हलोत्सोवाच्या वेळी जांभळाच्या झाडाखाली बाल्यावस्थेत लाभली होती. तेंव्हा त्या शुद्धोदनाचा सुपुत्र बुद्ध हा छ. शिवरायांचा वंशज म्हणावा लागेल. कारण छ.शिवरायांचा शिवनेरी वरील जन्म व त्या गडाच्या पायथ्याशी कोरलेली व असलेली बुद्धलेणी, तसेच अग-यावरून सुटून येताना गयेला जाऊन छ.शिवरायांनी घेतलेले बुद्धांचे दर्शन आणि छ. शिवरायांचे सुपुत्र छ. संभाजी महाराज यांनी लिहिलेला ‘ बुधभूषण ‘ हा ग्रंथ, हा काही योगायोग नाही. तर त्यात अनुवंशीक गुणही असू शकतात. यासाठी जे खास बुद्धांच्या व छ.शिवरायांच्या वांशिक गुणांचे होते, ते डॉ आंबेडकरांच्या शब्दावर परत आपल्या वंशजाच्या प्रज्ञामय घरात परक्यांचे घर सोडून व त्यांची गुलामी लाथाडून गेले. जे मागे राहिले त्यांनी परकीयांच्या गुलामीवर शिवरायांच्या तलवारीनेच वार करून स्वगृही परतावे व बुद्ध विचारांचे अनुकरण करावे. बुद्ध विचाराने चालणे म्हणजे बुद्धांचा धम्म स्विकारणे नव्हे. तर बुद्ध होणे म्हणजे गुलामी सोडून स्वतंत्र स्वाभिमानी होणे होय. हे कायम बुद्धांच्या मार्गावरून चालणा-यांनी लक्षात ठेवावे.




