
जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
जालना : दि. ११ जुलै २०२६ डोमेगाव येथील दलित वस्तीतील नाल्यांची दुरवस्था, साचलेली घाण, सांडपाण्याचा प्रश्न तसेच नियमित व शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता, ग्रामसेवकांच्या भेटीचा दिवस असूनही कार्यालयाला कुलूप असल्याचे आढळून आले.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ग्रामसेवक सतीश भापकर हे कार्यालयात उपस्थित नव्हते. कार्यालयात शिपाईही नसल्याने नागरिकांना निवेदन देता आले नाही. त्यानंतर ग्रामसेवकांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, “मला एकच गाव नाही, मला दुसरीही कामे आहेत,” असे उत्तर मिळाल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
मुख्य मागणीकर्ते गौतम खंडेभराड यांच्यासह आनंद खंडेभराड, दिलीप खंडेभराड, अजय घुले, संतोष घुले, बबन खंडागळे तसेच दलित वस्तीतील नागरिकांनी नाल्यांची तातडीने दुरुस्ती करणे, साचलेली घाण व सांडपाणी हटविणे, नियमित व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करणे तसेच दलित वस्तीतील सर्व मूलभूत नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने या मागण्यांची तात्काळ पूर्तता न केल्यास दि. १८ जुलै २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.
या गंभीर प्रकरणाची सरपंच डॉ. अशोक संपतराव काळबंडे, ग्रामसेवक सतीश भापकर, गटविकास अधिकारी (BDO), विस्तार अधिकारी (पंचायत), उपसरपंच, पंचायत समितीचे सभापती, पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हा परिषद सदस्य यांनी तातडीने दखल घेऊन दलित वस्तीतील समस्या त्वरित मार्गी लावाव्यात, अशी मागणी गौतम खंडेभराड, आनंद खंडेभराड, दिलीप खंडेभराड, अजय घुले, संतोष घुले, बबन खंडागळे तसेच दलित वस्तीतील नागरिकांनी केली आहे.




