जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
अंबड : दि. ११ जुलै २०२६ अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील दोन्ही गावठाणांना वीजपुरवठा करणारे दोन्ही वीज वितरण (डीपी) ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात होते. वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पुढाकार घेतला. शेतातील वीज लाईनचा फॉल्ट दूर करून सुमारे एक किलोमीटर अंतरावरून तात्पुरती वीज वायर टाकण्यात आली. त्याद्वारे पाणीपुरवठा यंत्रणा सुरू करण्यात आली आणि अखेर डोमेगावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आले.
या कामावेळी डोमेगावचे सरपंच डॉ. अशोक संपतराव काळबांडे, उपसरपंच सौ. कल्पना रमेश सांगळे, पाणीपुरवठा कर्मचारी बाबासाहेब शेळके तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे शिपाई विजय सुंदरलाल चौतमल उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत गावातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात आला.
दरम्यान, गावातील दोन्ही जळालेले डीपी तातडीने बदलून नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून महावितरण प्रशासनाकडे करण्यात येत आहे. नागरिकांना मूलभूत सुविधांचा त्रास होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.





