कल्याण प्रतिनिधी
प्रदीप जाधव
कल्याण : दि. १० जुलै २०२६ डोंबिवली येथील महापालिकेसमोर राहुल हुंबरे यांचे आमरण उपोषण सुरू; विविध मागण्यांसाठी आंदोलन
कल्याण तालुक्यातील समाजसेवक राहुल महादेव हुंबरे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विविध प्रलंबित नागरी प्रश्नांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. अनेक वेळा लेखी तक्रारी व प्रत्यक्ष अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
उपोषणामध्ये मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये ईस्ट कल्याण येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खर्चाचा हिशोब सार्वजनिक करणे, वालधुनी नदीपात्रातील बांधकामे तात्काळ हटविणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविलेल्यांवर फौजदारी कारवाई करणे तसेच पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
राहुल हुंबरे यांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनाकडे कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.




