निर्भिड आवाज न्युज दिपक गायकवाड(संपादक)
महाडच्या चवदार तळ्याच्या इतिहासाचे आपण आतापर्यंत दोन भाग पाहिले व हा सत्याग्रह दोन भागात केला गेला हेही लक्षात घेतले. आता आपण तिसरा व अंतिम भाग पहाणार आहोत. या सत्याग्रहास जाताना आपले समता सैनिक दल डॉ आंबेडकरांनी संगती घेतले होते. भाऊच्या धक्क्यावरून महाडला जाण्याचा निर्णय त्यांनी बोटीने घेतला होता. ,’ पद्मावती ‘ बोटीने ते आपला सारा तिनेशे साडेतीनशे लोकांचा लवाजमा घेऊन निघाले. बोटीने जाण्याचा निर्णय घेण्यामागे बाबासाहेबांची दूरदृष्टी होती. कारण महाडमधील स्पृशांनी चोख बंदोबस्त करून सत्याग्रहींना कोणतीच मदत करायची नाही व मिळूही द्यायची नाही असा चंग बांधला होता. एवढेच काय पण बाबासाहेबांच्या सत्याग्रहाला जागाही मिळवू द्यायची नाही असे त्यांनी गावकीची मिटींग घेऊन तसा ठराव केला होता. पण महाडचा सच्चा मुस्लिम बंधू ‘ फत्तेखान देशमुख ‘ याने त्या गावकीच्या ठरावाला व मनुवाद्यांच्या अरेरावीच्या दहशतीला अजीबात जूमानले नाही. त्याने आपले चार एकर शेत सत्याग्रहासाठी स्वखुशीने दिले. ठराव करूनही सत्याग्रहासाठी शेत व जागा मिळाली हे पाहून स्पृश्य सनातन्यांचे सर्वच मनसुबे मातीमोल झाले. त्यांनी फत्तेखानची मिनतवारी करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर एक दिवसाचे त्यांच्या दारात धरणे आंदोलन केले. तरीपण फत्तेखान डगमगला नाही. ‘ शब्द दिला तो दिला. आता परत मागे घेणे शक्य नाही ‘ असे त्याने धरणेकरांना शेवटचे ठणकावून सांगितले. हा सर्व अनुभव बाबासाहेबांना अगोदरचाच असल्याने, जर आपण गाडीने महाडला गेलो व गाडीवाल्याने आपल्याला अर्ध्यातच सोडले व ‘ मी तुम्हाला पुढे नेऊ शकत नाही ‘ असे म्हटल्यास आपण वेळेवर सत्याग्रहाला पोहचणार नाही. यासाठी त्यांनी बोटीने जाण्याचा योग्य निर्णय घेतला होता. यावेळी बाबासाहेबां बरोबर त्यांचे सवंगडी व आघाडीचे शिलेदार म्हणून धोंडी नारायण गायकवाड, कांबळे, गंगावणे, वनमाळी, पा.ना. राजभोज, नाशिकचे भाऊराव गायकवाड हि अस्पृश्य मंडळी होती. तर बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, प्रधान हि स्पृश्य मंडळीही होती. हा सारा प्रवास त्यांनी भाऊचा धक्का ते हरेश्वर असा केला. हरेश्र्वरला आल्यावर ही सारी मंडळी कोलमांडल्याला मुक्कामी आली. तेथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तेथील ‘ महार सेवा संघाचे ‘ अध्यक्ष पांडूरंग बाबाजी मांडलेकर व त्यांचे सहकारी महादेव पांडुरंग जाधव व धर्माबुवा आस्तेकर यांनी त्या सर्वांची जेवणाची व रहाण्याची उत्तम व्यवस्था ठेवली. यावेळी मुरूड, जंजिरा, श्रीवर्धन,मंडणगड येथील बरीच मंडळी यावेळी बाबासाहेबांच्या चळवळीला येऊन मिळाली. २५ डिसेंबरच्या सकाळी ही सर्व मंडळी ‘ अंबा ‘ नामक लाॅंचने दासगावला निघाली. या दासगावला डॉ आंबेडकरांचे व मंडळींचे परत जंगी स्वागत करण्यात आले. या बंदोबस्तासाठी कुलाबा जिल्ह्याचे डी. एस. पी. त्यांचे अधिकारी व पोलीस हजर होते. त्यांनी एक पत्र बाबासाहेबांच्या हाती दिले. ते जिल्हाधिकारी हूड साहेबांचे पत्र होते. बाबासाहेबांनी शांतपणे सर्वांना अभिवादन केले. मग सत्कार स्विकारला आणि मग शांतपणे जनसमुदायाकडे पहात म्हणाले ” मला कलेक्टर साहेबांनी भेटीसाठी बोलावले आहे. गाडी पण पाठवली आहे. मी बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांना संगती नेतो. मग शिवराम शिवतरकर यांना हाक मारून जवळ बोलावून म्हणाले ” मला पकड वारंट आले आहे. पण तुम्ही काळजी करू नका. मी हूड साहेबांना भेटून सभामंडपात महाडला येतो. डॉ आंबेडकर व हूड साहेबांची भेट झाली. या भेटीत हूड साहेबांनी डॉ आंबेडकरांना असे सांगितले की, ‘ महाडच्या स्पृश्यांनी तुम्हा विरूद्ध महाड कोर्टात केस टाकली असून, त्यांनी महाड नगरपरिषदेचा पाणवठे सर्वांना खुले करण्याचा ठराव रद्द करून, ते चवदार तळे खाजगी मालकीचे असल्याचे केसमध्ये नमुद करून त्यांनी तात्पुरता मनाई हूकूमही मिळवला आहे. यामुळे तुम्हाला त्या तळ्यावर जाता येणार नाही व ते परत बाटवताही येणार नाही.जर तुम्ही तसे केले तर ते तुमचे कृत्य सरकारच्या विरोधात होईल. मग मात्र मला तुम्हाला व तुमच्या माणसांना अटक करावी लागेल. तेंव्हा तुम्ही केसांचा निकाल लागे पर्यंत त्या तळ्यावर जाऊ नका. ” असे स्पष्ट सांगितले. यावर बाबासाहेबांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एक तोडगा त्यावर हूड साहेबांना सुचवला. तो असा की, ‘ आम्ही रांगेत तळ्यावर शांततेत जाणार, पण तळ्यात उतरणार नाही. तर तळ्याला घेरावा घालणार.” हा मध्यम मार्ग हूड साहेबांनाही पटला व त्याला त्यांनी होकार व समंती दिली. याच पद्धतीने या सत्याग्रहाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर हि केस बाबासाहेब दहा वर्षे लढले. या केसांचा निकाल महाड कोर्टात अस्पृश्यांच्या बाजूने लागला. डॉ आंबेडकरांचा विजय झाला. यावर महाडच्या स्पृश्य मंडळींनी ती केस महाडला जिल्हा न्यायालय नसल्याने ठाणे येथील जिल्हा न्यायालयात अपील करून नेली. तेथेही डॉ आंबेडकरच जिंकले. मग परत स्पृशांनी मुंबईच्या हायकोर्टात अपील केले. पण तिथेही परत डॉ आंबेडकरांचाच विजय झाला व महाडचे चवदार तळे अस्पृश्यांना कायमचे खुले झाले. यावेळी सत्याग्रहाला डॉ आंबेडकरां बरोबर आलेली जनता शांततेत महाडला पोहचली होती. दासगाव ते महाड हे पाच मैलाचे अंतर. पण हा लवाजमा नाचत , गाजत व डॉ आंबेडकर की जय, छ.शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देत आणि गाणी म्हणत सारे शिस्तीने महाडला पोहचले आले होते. डिएसपी व त्यांचा अधिकारीवर्ग व पोलिस चोख बंदोबस्त त्यांच्यावर ठेवून होते, हा एवढा मोठा समाज पाहून व पोलिसांना प्रमाणे दिसणारे समता सैनिक पाहून महाड वासीयांचे धाबे दणाणले. संपूर्ण महाडात भीतीचे वातावरण पसरले. ‘ हा डॉ आंबेडकर आपले एवढे सैन्य घेऊन महाडला येईल असे वाटले नव्हते ‘ अशी स्पृश्य मंडळी खाजगीत बोलू लागली. कोणी जर एखाद्याला चूकून दम दिला, तर तो उलट जबाब देऊन ‘ अंगाला तर हात लावून बघ, मग कसं तुझं टाळकं झोडतो ‘ असा उलटा जबाब त्याला भीमसैनिकांकडून मिळत होता. यामुळे गुरगुर करणारांचीही जाग्यावर फाटून धोतरं पिवळं व्हायची वेळ होत होती. डॉ आंबेडकर हूड साहेबांची भेट घेऊन तीन वाजता सत्याग्रह म़ंडपात पोहचले व कामकाजाला सुरुवात झाली . यानंतर पहिल्यांदा स्वागतगीत झाले. यानंतर काही भाषणे झाल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषणासाठी समोर आले. संपूर्ण सभामंडप घोषणांनी दणाणून गेला. मग शांतपणे डॉ आंबेडकरांनी भाषण सुरू केले व आजच्या परिषदेची वेळ स्पृशांनीच आपल्यावर आणली हे ठासून सांगितले. जर त्यांनी पहिल्याच वेळेला अस्पृश्यांच्या पाणी हक्काला संमती दिली असती व त्यांच्या जेवणात माती कालवून त्यांना मारझोड केली नसती व तळ्याच्या शुद्धीकरणाचा प्रयत्न केला नसता, तर आज येथे एवढ्या मोठ्यासंख्येने दूस-यांदा हा समाज आला नसता. असे ठणकावून सांगितले. यानंतर ऐकून चार ठराव या परिषदेत बहुमताने पास करण्यात आले. या ठरावावर फ्रेंच राज्यक्रांतीच्या मानवी हक्कांच्या जाहिरनाम्याचाच प्रभाव जास्त प्रमाणात पडलेला दिसून येत होता. पूढे याच ठरावाच्या तत्वांचा समावेश भारतीय संविधानात झाला. इतके मानवतावादी, समतावादी व राष्ट्रवादी पद्धतीचे हे ठराव होते. तसेच हि सत्याग्रह परिषद सुरू होण्या अगोदरच अनंतराव चित्रे यांनी सभा मंडपाच्या द्वाराशीच दीडफूट चौरस व सहा इंच खोलीची एक यज्ञवेदी बांधून घेतलेली होती व ती चंदनाच्या लाकडांनी भरून ठेवलेली होती. या यज्ञवेदी भोवती चारी कोणात चारखांब रोवले होते. त्यावर तिन्ही बाजूंनी ‘ मनूस्मृतीची दहनभूमी, अस्पृश्यता नष्ट करा, भीक्षूकीशाहीला गाडून टाका. असे फलक लावले होते. पण १९२७ साली महाडच्या मनूस्मृती दहन भूमीतून दिलेला भटशाही गाडून टाकण्याच्या संदेशाचे फक्त आजपर्यंत आजच्या बौद्धांनीच काटेकोर पालन केले. जर तेव्हापासूनच जर सर्वच मूळ भारतीय बहुजनांनी यांचे पालन केले असते , तर आज मूळभारतीय बहुजनांच्या भारतावर भटांचे राज्यही आले नसते व भटांची संघटनाही( आरएसएस ) पोसली गेली नसती आणि मूळभारतीय कोणाचे गुलामही झाले नसते. संत तुकारामां पासून ते मार्टिन ल्यृथरकींग पर्यंत सर्वच संत व समाजसुधारकांनी आपापल्या धर्मात राहूनच धर्मसुधारणा व धर्मप्रबोधन केले. पण कोणीच आपल्या धर्माचा धर्मग्रंथ जाळून त्याचा निषेध व्यक्त केला नाही. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मनूस्मृती दहानाचे पाऊल नव्या जगाची नांदी ठरली. म्हणून मनूस्मृती दहनाच्या घटनेला जगाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे भारतीयांना ज्यादिवशी समजेल त्यादिवशी तो दिवस भारतीयांच्या दृष्टीने सुवर्ण क्षण असेल. यात शंकाच नाही.




