काळवीट तलावात पोहताना मृत्यू
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या एनॅस्थेशिया विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यु तरकसे यांचा आज सकाळी काळवटी साठवण तलाव पोहताना मृत्यू झाला. सकाळी ६:३० च्या सुमारास त्यांच्या निधनाचे वृत्त अंबाजोगाई शहरात धडकले आणि डॉ. तरकसे यांच्या चाहत्यांनी काळवटी तलावाकडे धाव घेतली. डॉ. अभिमन्यु तरकसे यांना पोहताना -हदयविकाराचा तीव्र झटका आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अंबाजोगाई शहरालगत असलेल्या धावडी येथील मुळ रहिवासी असलेल्या डॉ. अभिमन्यु तरकसे यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले. शालांत आणि उच्च माध्यमिक परीक्षा अत्यंत चांगल्या गुणवत्तेने मिळवल्यानंतर त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातुन वैद्यकीय पदवी मिळवली. पुढे याच महाविद्यालयातुन त्यांनी एनॅस्थेशिया विषयातुन पदव्युत्तर शिक्षण घेतले. याच महाविद्यालयात ज्युनिअर रेसिडेंट ते भुलतज्ञ विभागाचा प्रमुख म्हणून ते काम कार्यरत होते.
प्रकृती सुदृढ ठेवण्यासाठी ते गेली अनेक वर्षांपासून नित्यनेमाने अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काळवटी साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत. आज सकाळी पोहण्यासाठी तलावात उतरण्यापुर्वी त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या चड्डीत बिसलरीची रिकामी बाटली ठेवली व ते तलावात उतरले.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सकाळी काळवीट साठवण तलावात ते पोहण्यासाठी एकटेच उतरले. काही वेळानंतर अलिकडे पोहत असलेल्या काही लोकांना सांडव्याकडील बाजूस एक बॉडी तरंगत आहे असा निरोप अलिकडे पोहत असलेल्या काही लोकांना दिला. नंतर हे सर्व जण पोहत त्या बाजूला गेल्यानंतर त्यांना सदरील बॉडी ही डॉ. अभिमन्यु तरकसे यांचीच असल्याची ओळख पटली.
या घटनेची माहिती तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात व अंबाजोगाई शहरात ही बातमी वा-यासारखी पसरली. घटनास्थळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर मित्रांनी धाव घेवून तातडीने पोलिस पंचनामा करून डॉ. अभिमन्यु तरकसे यांचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आणला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर डॉ. अभिमन्यु तरकसे यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. मात्र अभिमन्यु तरकसे यांचा मृत्यू पोहताना -हदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे झाला असावा व चड्डीत बिसलरीची रिकामी बाटली असल्यामुळे ते तरंगत तलावाच्या काठाला आले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. अभिमन्यु तरकसे यांच्या अकाली निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.






