केज प्रतिनिधी
केज : दि. ८ सप्टेंबर २०२६ बीड जिल्ह्यातील केज येथील पोलिस प्रशासनाने गुन्हा घडण्यापूर्वीच दरोडेखोरांच्या टोळीला लगाम घालणे आणि दुसरीकडे गांजाच्या बेकायदा लागवडीवर छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त करणे, अशा सलग दोन उल्लेखनीय कारवायांची केज पोलिसांच्या कामगिरीत नोंद झाली आहे. या दोन्ही कारवायांमध्ये कार्यतत्परता, प्रसंगावधान आणि अचूक नियोजन दाखवून प्रभावी कारवाई केल्याबद्दल केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण दत्तात्रय उंबरे व त्याच्या टीमचा बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भापोसे) यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.
पहाटे दरोड्याचा डाव; पोलिसांनी टोळीला घेरले
५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.१५ वाजता मांजरसुंबा ते केज मार्गावरील कोरेगाव पारधी वस्ती परिसरात, भोईटे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर धावत्या ट्रकमधून बळजबरीने साहित्य काढण्याचा प्रयत्न तसेच दरोड्याची तयारी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गोपनीय माहिती मिळताच सपोनि. लक्ष्मण उंबरे यांनी विलंब न करता तिची खातरजमा करून पथकासह कारवाई केली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईत दरोड्याच्या तयारीतील आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींकडून धारदार हत्यारे, लोखंडी टांबी, कोयते, सत्तूर, तलवार, विळा, मिरची पावडर, पिवळी रस्सी, चेहरा झाकण्यासाठी वापरण्यात येणारा लाल कपडा आणि आठ मोटारसायकली, असा तब्बल ४ लाख ६२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५६८/२०२६ अन्वये BNS कलम ३१०(४), ३१०(५) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दरोडा पडण्याआधीच पोलिसांचा ‘ब्रेक’
या कारवाईचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गुन्हा घडल्यानंतर तपास करण्याऐवजी संभाव्य दरोडा घडण्यापूर्वीच पोलिसांनी टोळीला जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेला निर्माण होणारा संभाव्य धोका टळला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा गुन्हा आणि त्यातून उद्भवणारी कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती रोखण्यात यश आले.
गायरानात गांजाची लागवड; १४.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त
दरोड्याच्या कारवाईनंतर अवघ्या दोन दिवसांनी, ७ सप्टेंबर २०२६ रोजी केज पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातही धडक कारवाई केली. गायरान जागेत विना परवाना गांजा सदृश झाडांची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची पडताळणी करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. आरोपीच्या घरासमोरील मोकळ्या जागेत गवताच्या मध्यभागी बेकायदेशीररीत्या लागवड केलेली ७४.४३२ किलो गांजा सदृश झाडे/गांजा आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत १४ लाख ८८ हजार ६४० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध NDPS Act कलम ८(ब), २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थांच्या बेकायदा लागवड व साठवणुकीवर पोलिसांनी थेट घाव घातला.
एकाच अधिकाऱ्याच्या दोन कारवायांची दखल
एकीकडे दरोड्याचा संभाव्य धोका ओळखून टोळीला गुन्हा घडण्यापूर्वीच जेरबंद करणे, तर दुसरीकडे गोपनीय माहितीच्या आधारे गांजाची बेकायदा लागवड शोधून लाखोंचा मुद्देमाल जप्त करणे, या दोन्ही कारवायांतील कार्यतत्परतेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. कर्तव्यनिष्ठा, प्रसंगावधान, तपासकौशल्य, तत्परता आणि गुन्हेगारीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्याच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सपोनि. लक्ष्मण उंबरे यांचे कौतुक करत प्रशस्तीपत्र प्रदान केले.
गुन्हेगारांसाठी स्पष्ट संदेश
केज पोलिसांच्या या दोन्ही कारवायांमुळे गुन्हेगारीविरोधातील पोलिसांची भूमिका स्पष्ट झाली आहे. दरोड्याचा कट असो वा अंमली पदार्थांची बेकायदा लागवड—गोपनीय माहिती मिळताच तिची पडताळणी करून थेट कारवाई करण्याची पोलिसांची कार्यपद्धती गुन्हेगारांसाठी इशाराच ठरली आहे.सपोनि. लक्ष्मण उंबरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या दोन्ही उल्लेखनीय कारवायांची बीड जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीत ठळक नोंद झाली असून, प्रशस्तीपत्राच्या माध्यमातून वरिष्ठ स्तरावरही त्याची अधिकृत दखल घेण्यात आली आहे.






