रामकिसन अवधूत
जालना प्रतिनिधी
जालना : दि १४ ऑगस्ट २०२६ अंबड तालुक्यातील घु.हदगाव येथे कापूस उत्पादकता अभियान व कपास क्रांती योजना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कापूस, सोयाबीन व मोसंबी पिकांमधील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात ग्लोबल विकास ट्रस्टचे श्री. बाबू येवले सर यांनी कापूस पिकातील सद्यस्थिती, पिकाची वाढ, किडी व रोगांचा प्रादुर्भाव तसेच त्यावर करावयाच्या प्रभावी उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. सध्याच्या हवामान परिस्थितीत कापूस पिकावर रसशोषक किडी, अळीवर्गीय किडी तसेच विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी नियमितपणे शेताची पाहणी करून पिकाच्या स्थितीचे निरीक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
किडींचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी वेळेवर निदान करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे येवले सर यांनी स्पष्ट केले. किडींची संख्या, प्रादुर्भावाची तीव्रता आणि पिकाची अवस्था लक्षात घेऊनच कीड नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. अनावश्यक व वारंवार रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, यावर त्यांनी विशेष भर दिला.
पक्षी थांबे, चिकट सापळे, कामगंध सापळे, निंबोळी अर्क आदी पर्यावरणपूरक उपायांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास किडींचे नियंत्रण करण्यास मदत होते. यामुळे रासायनिक कीटकनाशकांवरील खर्च कमी होण्यासोबतच मित्रकीटकांचे संवर्धन व किडींचे नैसर्गिक नियंत्रण होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले. कापूस, सोयाबीन व मोसंबी पिकांमध्ये एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटर, अंबड यांनी ‘अशोक सव्वाशे सद्य परिस्थितीत कमी खर्चामध्ये तीन सैनिक’ या संकल्पनेनुसार कापूस व सोयाबीन पिकांमध्ये लागवडीनंतर एकरी २० पक्षी थांबे उभारण्याचे आवाहन केले. तसेच चिकट सापळे व कामगंध सापळ्यांचा प्रभावी वापर करून किडींचे नियंत्रण करावे. या उपाययोजनांमुळे किडींचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होऊन रासायनिक कीटकनाशकांवरील खर्च कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
सहाय्यक कृषी अधिकारी संकेत डावरे यांनी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्काच्या वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दर १५ दिवसांच्या अंतराने निंबोळी अर्क व दशपर्णी अर्काची फवारणी केल्यास रसशोषक किडींसह अळीवर्गीय किडींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. रासायनिक कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळून जैविक व पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांनी पिकांची नियमित पाहणी, किडींचे वेळीच निदान आणि गरजेनुसार योग्य उपाययोजना यांना प्राधान्य दिल्यास उत्पादन खर्च कमी करून कापूस व सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविता येऊ शकते, असा संदेश या शेती शाळेतून देण्यात आला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यशवंत बिराजदार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी बंडूभाऊ शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदरील कार्यक्रमाला घु. हादगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




