वडीगोद्री येथे व्यवसाय प्रशिक्षणाचा समारोप ; प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप
रामकिसन अवधूत
जालना प्रतिनिधी
दि. १२ ऑगस्ट २०२६ व्यवसायात यश मिळविण्यासाठी योग्य प्रशिक्षण,नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास आवश्यक आहे.तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभारून रोजगार देणारे उद्योजक बनावे.शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपल्या कल्पकतेच्या जोरावर व्यवसायाचा विस्तार करावा,असे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,जालना,शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान व शांताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला.यावेळी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
एम.सी.ई.डी.चे प्रकल्प अधिकारी विनोद तुपे यांनी तरुणांनी ‘नोकर’ होण्यापेक्षा ‘मालक’ होण्याचे स्वप्न पाहावे,असे आवाहन केले.व्यवसाय उभारणीपासून विस्तारापर्यंत आवश्यक मार्गदर्शन एम.सी.ई.डी.च्या माध्यमातून करण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष घृष्णेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन सतीश चव्हाण यांनी व्यवसायाला मुलाप्रमाणे जपण्याचा सल्ला दिला.सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायाची प्रभावी जाहिरात केल्यास अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येते.कोरोनाच्या काळातही शेती व शेतीशी निगडित व्यवसाय सुरू होते.त्यामुळे भविष्यात शेती व कृषीपूरक व्यवसायाला मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
बँक ऑफ महाराष्ट्रचे अग्रणी बँक अधिकारी कैलास तावडे यांनी व्यवसायासाठी बँकिंग साक्षरतेचे महत्त्व सांगितले.कर्ज घेताना अर्धवट माहितीवर निर्णय न घेता व्यवसायाचा संपूर्ण अभ्यास करूनच बँकेकडे जावे,असे त्यांनी नमूद केले.
कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राचार्य डॉ.ओमप्रकाश कुहिरे यांनी पोखरा योजनेअंतर्गत शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी उपलब्ध संधींची माहिती दिली.शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीकडे पाहावे आणि पुढील पिढीसाठी सुपीक जमीन जपावी,असे आवाहन त्यांनी केले.
व्यावसायिक मार्गदर्शक प्रा.डॉ.अशोक काकडे यांनी पशुपालन व्यवसायात खरेदीपासून विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्याचा अभ्यास आवश्यक असल्याचे सांगितले.व्यवसायाच्या यशासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रभावी मार्केटिंग महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब गावडे,राजू आटोळे,चंद्रकांत खमितकर,काकासाहेब बोंबले,प्रशिक्षक गजानन गाढे यांच्यासह महिला व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.व्ही.छल्लारे यांनी केले,तर आभार कार्यक्रम समन्वयक कैलास भाबट यांनी मानले.


