प्रदिप जाधव
ठाणे प्रतिनिधी
डोंबिवली: २३ जुलै २०२६ दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ व विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला डोंबिवलीत प्रतिसाद मिळाला.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत निदर्शने करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. काही भागांत व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला, तर अनेक ठिकाणी जनजीवन सुरळीत सुरू असल्याचेही पाहायला मिळाले.
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रमुख चौक आणि संवेदनशील ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी केली.




