पुणे जिल्हा प्रतिनिधी
निशा विसपुते
पुणे : दि. १३ जुलै २०२६ पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे व घोरावाडी परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व निकृष्ट दर्जाची कामे होत असून याकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे व घारेवाडी परिसरात चालू असलेल्या विकासकामात अनियमितता भ्रष्टाचार व होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व आरटीआय कार्यकर्ते अनुप तानाजी भेगडे यांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी संबंधित विभागांना वेळोवेळी लेखी तक्रारी, छायाचित्रे व इतर पुरावे सादर करूनही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, गावतळ्यावरील रस्त्याचे काम सुरू असतानाच संबंधित कामामध्ये माती टाकून त्यावर थेट काँक्रीट स्लॅब टाकण्यात येत असल्याचे छायाचित्रांसह नगरपरिषदेकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. संबंधित अधिकाऱ्यांना काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती वेळेत देण्यात आली होती. मात्र, या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी, सद्यस्थितीत झालेल्या पावसामुळे संबंधित रस्ता वाहून गेला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय नगरपरिषदेच्या हद्दीतील तसेच गावतळ्यावरील तुटलेले कठडे आजही दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असूनही संबंधित विभागाने आवश्यक ती कार्यवाही केलेली नाही.
तळेगाव दाभाडे व घोरावाडी परिसरातील प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे आहेत:
– रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे व रखडलेली दुरुस्ती.
– पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक नसणे.
– सुरू असलेल्या विकासकामांचा निकृष्ट दर्जा.
– वारंवार तक्रारी करूनही अधिकारी व संबंधित विभागांकडून कारवाई न होणे.
– गोकुळधाम परिसरातील अनधिकृत डंपर वाहतुकीमुळे मरीमाता मंदिर ते कुंभारवाडा रस्ता खचणे व चिखल साचणे.
– पोकलेन व अवजड यंत्रांमुळे रस्त्यांचे नुकसान.
– चार वर्षांपूर्वीच्या भूमिगत गटार कामातील त्रुटींवर संबंधित ठेकेदारावर कारवाई न होणे.
– उद्यान विभागाकडे तक्रार करूनही पडलेली व कापलेली झाडे अनेक दिवस न हटविणे.
– नव्याने तयार झालेले रस्ते अल्पावधीत पुन्हा खोदणे व त्यांच्या वॉरंटी/गॅरंटीबाबत माहिती न देणे.
– नगरपरिषद हद्दीतील तुटलेले कठडे आणि इतर धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष.
या सर्व प्रकरणांबाबत संबंधित विभागांना वेळोवेळी लेखी तक्रारी व छायाचित्रांसह पुरावे सादर करण्यात आले आहेत. हे सर्व पुरावे प्रसारमाध्यमे व संबंधित शासकीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
म्हणून तळेगाव दाभाडे व घोरावाडी परिसरातील सर्व विकासकामांची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषी अधिकारी, अभियंते, ठेकेदार व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे शासनाच्या निधीचे झालेले नुकसान व त्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींची जबाबदारी निश्चित करून नागरिकांसमोर संपूर्ण अहवाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.







