डोमेगावची पाणीटंचाई दूर,शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा
जालना प्रतिनिधी
रामकिशन अवधूत
जालना : ३० जून २०२६ जालना जिल्ह्यातील डोमेगाव परिसरातील गलाटी नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो झाला असून डोमेगाव परिसरातील नागरिकांना पाणी टंचाई पासून दिलासा.
गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या डोमेगाव परिसरासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे.सामाजिक बांधिलकी जपत बाबासाहेब शेळके व सविता शेळके यांनी गलाटी नदीतील महादेव मंदिराजवळील शिळांच्या परिसरात स्वखर्चातून उभारलेला बंधारा आज ओव्हरफ्लो झाला असून त्यामुळे परिसरातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.या बंधाऱ्यामुळे डोमेगाव येथील सामुदायिक विहीर,हातपंप तसेच आसपासच्या विहिरींमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डोमेगावमध्ये सन २०२४,२०२५ आणि २०२६ या कालावधीत तीव्र पाणीटंचाई जाणवली होती.गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीने तळ गाठल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.या कठीण परिस्थितीत बाबासाहेब शेळके व सविता शेळके यांनी कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता स्वखर्चातून दोन बोअरवेल घेतल्या.त्या बोअरवेलमधील पाणी सामुदायिक विहिरीत सोडून गावाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.त्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय टळली आणि पाणीपुरवठा काही प्रमाणात सुरळीत राहिला.
याचबरोबर दीर्घकालीन उपाय म्हणून त्यांनी गलाटी नदीमध्ये बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला.या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवले जाऊन भूजल पुनर्भरणास मोठी चालना मिळाली आहे.आज हा बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने नदीकाठच्या परिसरातील विहिरी,हातपंप आणि शेतीसाठीच्या पाणीस्रोतांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढली असून आगामी काळात सिंचनालाही याचा मोठा लाभ होणार आहे.
विशेष म्हणजे,सन २०१२ ते २०२३ या कालावधीत डोमेगाव व परिसरातील गावांना जवळपास दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता.मात्र सन २०२४ ते २०२६ या कालावधीत टँकरची आवश्यकता भासली नाही.स्थानिक जलसंधारणाचे प्रयत्न स्वखर्चातून करण्यात आलेली पाणी व्यवस्था आणि बंधाऱ्यामुळे गाव टँकरमुक्त होण्यास मोठी मदत झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
ग्रामस्थांनी बाबासाहेब शेळके व सविता शेळके यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांच्या या उपक्रमामुळे डोमेगावच्या पाणीप्रश्नावर प्रभावी उपाय झाला असल्याची भावना व्यक्त केली आहे.भविष्यातही अशाच लोकसहभागातून जलसंधारणाची कामे झाली.तर ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर होण्यास मोठी मदत होईल,असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.






