
लातूर प्रतिनिधी
लातूर : दि. २५ जून २०२६ लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि सर्वसामान्यांचे जगणे अवघड करणाऱ्या शिवहार बाबू सावंत नामक गुंडाच्या पोलीस प्रशासनाने अखेर मुसक्या आवळल्या देवणी तालुक्यात मारहाण, विनयभंग आणि दहशतीचे सत्र चालवणाऱ्या या शिवहार बाबू सावंत (वय ३०, रा. माटेगडी) याला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी तडिपार (हद्दपार) करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून देवणी तालुक्यात शिवहार सावंत याने कायद्याला न जुमानता दहशत माजवली होती. त्याच्याविरुद्ध मारहाण, गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ, धमकावणे, घरात घुसून हल्ला करणे आणि महिलांचा विनयभंग असे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल आहेत. गावात इतकी दहशत निर्माण केली होती की, त्याच्या कृत्यांविरुद्ध तक्रार देण्यासही नागरिक धजावत नव्हते.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या गुंडाचा सखोल तपास केला. यापूर्वीही त्याच्यावर अनेक प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या होत्या, मात्र तरीही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट, त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती अधिकच फोफावली होती.
दंडाधिकाऱ्यांचा कठोर निर्णय
उपविभागीय पोलीस अधिकारी, निलंगा यांच्या अहवालाची गंभीर दखल घेत, उपविभागीय दंडाधिकारी शरद झाडके यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ अन्वये, १५ जून २०२६ रोजी शिवहार सावंत याला सहा महिन्यांसाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आण्णाराव खोडेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय पाटील, पोलीस अंमलदार गुणाले, लामतुरे, अभिजित डोईजोडे यांनी केली.
देवणी पोलीसांची करडी नजर!
तडिपारीच्या या सहा महिन्यांच्या कालावधीत सावंत याला तो जिथे वास्तव्यास असेल, त्या परिसरातील पोलीस ठाण्यात दर आठवड्याला हजेरी लावावी लागणार आहे. जर त्याने या आदेशाचे उल्लंघन केले, तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सामान्य नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. भविष्यातही अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध ही कठोर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली जाईल. असे आश्वासन आण्णाराव खोडेवाड, पोलीस निरीक्षक देवणी यांनी दिले.






