जालना प्रतिनिधी
जालना : दि. २५ जून २०२६ अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाणे हद्दीत वाळू चोरी, अवैध वाळू तस्करी, जीवे मारण्याच्या धमक्या देणे तसेच सार्वजनिक रस्त्यावर नागरिकांना मारहाण करणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार गुंतलेला कुख्यात वाळू तस्कर समीर महेबुब पठाण (वय ३१, रा. डोणगाव, ता. अंबड, जि. जालना) यास गोंदी पोलिसांनी वडीगोद्री येथे अटक केली आहे.
समीर पठाण याच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाईचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्याच्या बेकायदेशीर व समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिनियम १९८१ कलम ३ (१) अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव वरिष्ठांच्या मार्फत सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावास जिल्हादंडाधिकारी जालना यांनी दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी मंजुरी दिली. त्यानंतर आरोपीवर गोपनीय पाळत ठेवण्यात आली. खबऱ्यामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार दिनांक २४ जून २०२६ रोजी वडीगोद्री येथे छापा टाकून त्यास अटक करण्यात आली. अनेक दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
ही कारवाई मा . श्री . तेगबीर सिंह संधू पोलीस अधिक्षक जालना , मा . श्री . विक्रम साळी अप्पर पोलीस अधीक्षक जालना, मा . श्री . शिद्धेश्वर धुमाळ उपविभागीय पोलीस आधिकारी अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि अमोल गुरले, पोलीस उपनिरीक्षक हरी जंगले, तसेच पोलीस कर्मचारी एस. के. शिद्दीकी, जी. पी. भवरे, जोतीलाल राठोड यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानबद्ध करण्यात आलेल्या समीर महेबुब पठाण यास एक वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करीविरोधात गोंदी पोलिसांनी कडक पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात होत असून नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.





