ज्ञानेश्वर वाकडे खून प्रकरण: घाटनांदूरचे सरपंच महेश गारठे यांना तपासाअंती पोलिसांकडून क्लीन चिट!
🔹 इतर सर्व दहा आरोपी गजाआड
महेंद्र गोदाम
घाटनांदूर प्रतिनिधी
अंबाजोगाई: तालुक्यातील घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात ११ जुलै रोजी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सोशल मीडियावरील वादातून उद्भवलेल्या या भयानक घटनेचा अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपास करत सर्व दहा मारेकऱ्यांना अटक केली आहे. या हत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले आणि अटकेची मागणी होत असलेले घाटनांदूरचे सरपंच तथा ‘आई मंगल कार्यालया’चे मालक महेश गारठे यांचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग नसल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्यांना अधिकृतरित्या ‘क्लीन चिट‘ दिली आहे.
सोशल मीडियावरील किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या गुन्ह्यात झाले. ११ जुलै रोजी रात्री मयत तरुण आणि त्याचा मित्र प्रथमेश जोगदंड यांच्यावर आरोपी सोमनाथ कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी चाकू, विटा आणि दगडांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा छातीवर आणि डोक्यावर वार झाल्याने मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवली. मयताचे वडील उत्तरेश्वर वाकडे यांच्या फिर्यादीवरून सुरुवातीला सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी सोमनाथ कांबळे याच्यासह विशाल पंडीत शिंदे, गोकुळ मरीबा इचके, सुरज ताटे, समाधान मिसाळ, श्रीहरी ऊर्फ कन्हैया मिसाळ, गणेश खंदारे या सात आरोपींना आणि नंतर निष्पन्न झालेल्या चांदणे, सारंग शिंदे आणि सागर मिसाळ या तीन अशा एकूण दहा जणांना पोलिसांनी ७२ तासांच्या आत अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या.
गुन्हा घडल्यानंतर काही आरोपी घाटनांदूर येथील ‘आई मंगल कार्यालयात’ लपून बसले होते आणि तिथूनच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याच कारणामुळे मंगल कार्यालयाचे मालक आणि सरपंच महेश गारठे यांच्यावरही संशय व्यक्त करत त्यांना मुख्य आरोपी करून अटक करण्याची जोरदार मागणी काही घटकांकडून होत होती. मात्र, अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी पोलीस निरिक्षक मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बाजूंनी आणि पुराव्यांच्या आधारे कसून तपास केला. या तपासाअंती या खून प्रकरणात केवळ अटक करण्यात आलेले दहाच आरोपी सामील असून त्याव्यतिरिक्त अन्य कोणाचाही सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे महेश गारठे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले गेले असून त्यांना या प्रकरणातून पूर्णपणे मुक्त करत क्लीन चिट देण्यात आली आहे.





