पुणे प्रतिनिधी
पुणे : २४ जून २०२६ मालेगाव येथील साहित्यिक, कवी, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते व पत्रकार रविराज सोनार यांचा सातारा येथील पहिल्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात स्वराज्य रक्षक महाराणी ताराबाई सन्मान प्रदान करण्यात आला.तर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सातारा येथे संपन्न झालेल्या शब्दगंध साहित्य संमेलनात पहिल्या राज्यस्तरीय महाराणी ताराबाई सन्मानाने श्री सोनार यांना गौरविण्यात आले आहे. तसेच सांगली येथील एडी फाउंडेशनच्या वतीने आॅगस्टमध्ये पुणे येथे आयोजित भव्य कार्यक्रमात भारतभूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सातारा येथे पहिल्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य मंचच्या माध्यमातून आयोजित काव्य संमेलनात स्वराज्य रक्षक महाराणी ताराबाई सन्मान देऊन श्री. सोनार यांना गौरविण्यात आले. शब्दगंध साहित्य मंचच्या अध्यक्षा तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या महिला सरचिटणीस जयश्री हुंबरे-दरेकर यांनी सातारा येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री. सोनार यांना नुकताच वाई येथे आयोजित ५व्या मिरग नक्षत्र साहित्य संमेलनात छत्रपती शिवाजी महाराज साहित्य पुरस्कारही मिळाला होता. मुळचे मालेगाव येथील रहिवासी असलेले श्री. सोनार सध्या पुणे येथे वास्तव्यास असून पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी आपल्या साहित्य सेवेमुळे नावलौकिक मिळवला आहे. श्री. सोनार हे लेखक, कवी, समीक्षक, संपादक म्हणून परिचित असून गेली ३४ वर्षे पुर्णवेळ पत्रकारिता करीत आहेत. ‘कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’तून होणारा जनसंवाद’ या विषयावर त्यांनी संशोधन केले असून त्यांचा शोध प्रबंध हा अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे. ‘मोक्षिणीधारा’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासह अनेक पुस्तके व विशेषांक त्यांनी संपादित केले आहेत. अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिली असून पाठराखण (ब्लर्ब लेखन) केले आहे. साहित्य, संस्कृती, इतिहास हे त्यांचे आवडीचे विषय असून ते माध्यम तज्ज्ञ आहेत. तसेच त्यांचे यासंदर्भात अनेक व्याख्याने झाली आहेत. नाशिक जिल्ह्यासजह पुणे येथील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीत ते सक्रिय आहेत. शब्दगंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मालेगाव मराठी साहित्य संघ माजी अध्यक्ष, दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल,(पुणे) अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल माजी कार्याध्यक्ष व नाशिक जिल्हा संघटक यांसह प. बा. काकाणी नगर वाचनालय सहकार्यवाह, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड कार्याध्यक्ष तथा प्रमुख कार्यवाह, प्रगतीशील लेखक संघाचे उपाध्यक्ष, सृष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे जनसंपर्क संचालक आदी पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत.
यापूर्वी श्री सोनार यांना वैष्णव मित्र पुरस्कार, लोकमान्य गौरव पुरस्कार, प्राप्त जनमित्र पुरस्कार, नेहरू युवा गौरव पुरस्कार, कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर पुरस्कार, साहित्य साधना पुरस्कार, स्व.अनिता जाधव स्मृती पुरस्कार यांसह विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.





