रामकिसन अवधूत
( जालना प्रतिनिधी )
अंबड : दि. २० जून २०२६ अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन दिवस एकाच शेतकऱ्यांच्या वासरांवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली असून वनविभागाच्या निष्क्रीयतेबाबत गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
येथील शेतकरी श्री. शिवाजी आप्पासाहेब गव्हाणे यांच्या गट नं. ९७ मधील शेतात गाईंचा गोठा आहे. दिनांक १९ जून २०२६ रोजी रात्री बिबट्याने गोठ्यात घुसून एका वासराचा फडशा पाडला. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ ग्रामपंचायत, तलाठी, ग्रामसेवक तसेच वनविभागाला दिली. मात्र कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने दुसऱ्याच दिवशी पुन्हा बिबट्याने हल्ला केला.
दिनांक २० जून २०२६ रोजी सकाळी गोठ्याकडे गेले असता दुसरे वासरू अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी बिबट्याच्या पायांच्या ठळक खुणा दिसून आल्या. या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
महिला शेतात जाण्यास घाबरत असून शेतवस्त्यांवरील विद्यार्थी शाळेत जाण्यास भीती व्यक्त करत आहेत. शेतकरी दिवसा जनावरे चारण्यासाठी नेण्यासही धजावत नाहीत. अशा गंभीर परिस्थितीत वनविभागाकडून पिंजरा लावणे, कॅमेरे बसवणे किंवा बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने वनविभाग निष्क्रीय असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाला निवेदन देण्याचे ठरवले असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, पिंजरे लावावेत, कॅमेरे बसवावेत तसेच शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
घुंगर्डे हादगाव येथील शेतकऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाला तात्काळ सूचना देत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.





