
संपादक दिपक गायकवाड
आपल्या देशात धर्माच्या बाबतीत संशोधन व सत्यता यांना डावालून अंधश्रद्धा व धार्मिक स्तोम यांनाच कायम उत येवून, असत्याचाच नेहमी उदोउदो झाला आहे. याला कारणे अनेक जरी असली किंवा आपल्या देशाची धार्मिक व्यवस्था हि नेहमीच यहूदी वंशाच्या परकीय आर्य वर्णीयांच्या ताब्यात राहिल्याने मूळभारतीयांना धार्मिक गुलामी आजपर्यंत स्विकारावी लागलेली आहे हे सत्य डावलून चालणार नाही. हे परकीय आर्य भारतात येण्याअगोदर मूळभारतीयांचा कोणताच धर्म नव्हता. होती ती फक्त संस्कृती. ती म्हणजे ‘ सिंधू संस्कृती ‘. हि संस्कृती मूळभारतीयांनी स्वतः स्थापन केलेली होती व ती आशिया खंडात प्रसिद्ध होती. तिचे पुरावे आजही मोंजदडो व हडप्पा या शहरांच्या उत्खननाच्या इतिहासात वाचायला मिळतात. पण या परकीय आर्यांनी पहिला घाव या सांस्कृतिक शहरांवर घालून ती जाळून उद्धवस्त केली. याचे पुरावे ऋग्वेदात जी शहरे जाळली, त्या ऋग्वेदाच्या ऋचा वाचल्यानतंर कळते व समजूनही येते. ( ऋग्वेदात मूळभारतीयांच्या शहरांना ‘ पूरे ‘ म्हटलेले आहे. ) यानतंर या परकीय आर्यांनी आपली चातुर्वण्य व्यवस्थेची घडी बसवली व स्वतःला उच्च वर्णीय घोषित करून मूळभारतीयांना आपले धार्मिक गुलाम केले. तेंव्हापासून ते आजपर्यंत मूळभारतीय हे या परकीय ब्राम्हणी वर्णाचे गुलामच आहेत, ते आजपर्यंत कधीच स्वतंत्र झालेले नाहीत. पण हे गुपित त्यांनी कधीच मूळभारतीयांना समजू दिले नाही याची ते नेहमीच खबरदारी घेत राहिले व आजही घेतच आहेत. यामुळे मूळभारतीयांना ना बुद्ध कळाला अथवा ना विठ्ठल व संत तुकाराम कळाला. आणि ज्यांना कळाले त्यांच्य विरोधात या परकीय यहुदी वंशाच्या आर्य लोकांनी नेहमीच धर्माचे गौडबंगाल उभे करून मूळभारतीयांना चकवण्याचा प्रयत्न केला व आजही हिंदूत्वाच्या नावाखाली चकवून आपलेच राज्य पुन्हापुन्हा स्थापित करतच आहेत. जर कधी मूळभारतीयांना बुद्ध कळाला असता तर मूळभारतीयांची सिंधू संस्कृती वाचली असती व मूळभारतीय परकीय आर्यांचे गुलाम कधीच झाले नसते. कारण बुद्ध हा मूळभारतीय भूमिपुत्र असतानाही त्याचे तत्त्वज्ञान जगाने व जगातील थोर शास्त्रज्ञांनी स्विकारले, पण मूळभारतीयांनी स्विकारून नतंर फेकून दिले व मंत्र – तंत्र, होम – हवन व अंधश्रद्धा यावर कायमचा भर देवून मूळभारतीयांना मूर्खात काढून कायमच मूर्खात ठेवले. यामुळे मूळभारतीयांनी आपल्याच वंशाच्या बुद्धाला व भूमिपुत्र धम्मवीराला बाजूला फेकले व परकीयांच्या गुलामीचे जू स्वतःहून मानेवर घेऊन, हिंदूत्व हिंदूत्व असे बोंबलत राहिले व ‘ स्व ‘ ची जाणीव पार विसरून गेले. पण हे सारे करत असताना या आर्य ब्राम्हणांना भारतीय भूमीचा भूमिपुत्र असणारा बुद्ध याला सोडून आपले बस्तान बसवणे अशक्य झाले. कारण मूळभारतीय बुद्धविचारांना सोडून, परकीय आर्यब्राम्हणांच्या परकीय वैदिक धर्माकडे यायला सहजासहजी तयार नव्हते. यासाठी या परकीय आर्य ब्राम्हणांनी त्यांच्या ‘ विष्णू ‘ या ब्राह्मण वीराला व मूळभारतीया विरुद्ध लढून मूळभारतीयांची कत्तल करणा-याला देव म्हणून प्रथम घोषित केले व त्याच्याच नावाची दशावतार पद्धत रूढ करून बुद्धाला विष्णूचा नववा अवतार घोषित केले. यामुळे मूळभारतीय बौद्ध समाज हळूहळू या परकीय आर्यब्राम्हणांच्या वर्ण वर्चस्वाखाली येऊ लागला. मूळभारतीय बौद्ध समाज आपल्या वर्ण वर्चस्वाखाली येतोय हे पाहून त्याला कायमचे जखडून ठेवण्यासाठी या परकीय ब्राम्हणी लोकांनी मनूस्मृती ग्रंथाला जन्मास घातले व त्याचा प्रचार प्रसार करून मूळभारतीयांनाच अमाणूष पद्धतीने वागवायला सुरवात केली. पण तरीही मूळभारतीयांच्या मनमस्तकातला बुद्ध जात नाही हे अचूक हेरून त्यांनी बुद्धांनाच विठ्ठलाच्या रूपात उभे केले. सुरवातीला ब्राम्हणी पंचांगावर नवव्या अवतारी बुद्धांना स्थान दिले व नंतर बुद्धाला बाजूला करून नवव्या अवतारी जागेवर विठ्ठलाला छापून त्याखाली बुद्ध लिहायला सुरवात करून मूळभारतीयांची धार्मिक दिशाभूल केली. याविषयी थोर संशोधक डॉ. रा. चि. ढेरे आपल्या ‘ श्रीविठ्ठल : एक महासमन्वय ‘ या ग्रंथात पृष्ठ २३० वर असे सांगतात की, ” मराठी संतसाहित्यात विठ्ठल हा बुद्ध असल्याची धारणा जशी वारंवार स्पष्ट शब्दात प्रकट झालेली आहे,तशीच ती महाराष्ट्रात चित्र आणि शिल्प या माध्यमातूनही प्रकट झालेली दिसते. महाराष्ट्रात शिळाप्रेसवर पंचागे छापली जाऊ लागल्यावर दीर्घ काळपर्यंत पंचांगाच्या पृष्ठभागावर नवग्रहांची अथवा दशावतारांची चित्रे छापीत असत. या दशावतारांच्या चित्रांत नवव्या अवताराच्या स्थानी न चुकता विठ्ठलाचेच ( एकट्याचे अथवा रुक्मिणी सहित) छापलेले चित्र दिसते आणि त्या बाबतीत आपल्याला कसलीही शंका उरू नये, म्हणून त्या चित्रावर बुद्ध वा बौद्ध असे नावही छापलेले आढळते. ” त्यानंतर ते पुढे अधिक माहिती पुरवताना लिहितात, ” तुलनेने अलिकडे छापलेल्या ‘ श्रीरामसहस्त्रनाम ‘ नामक एका स्तोत्राच्या पुस्तकात गरूड हनुमंतसहित विठ्ठल रुक्मिणीचे चित्र छापलेले असून, त्याचे नाव मात्र ‘ बौद्ध ‘ असे छापले आहे. दशावतारांत बुद्धाच्या जागी विठ्ठल असल्याची दोन तरी शिल्पे मला माहीत आहेत : एक तासगाव ( जि.सांगली ) येथे विंचूरकरांनी बांधलेल्या दक्षिणी शैलीच्या गणेशमंदिराच्या गोपुरावर आहे आणि दुसरे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या प्राकारातील एका ओवरीत आहे. ” म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी पंढरीचा पांडुरंग हा बुद्ध आहे व पांडूरंगाचे मंदिर हे पूर्वीच बुद्ध विहार आहे. असा दावा केला होता व तो सत्य पण होता. कारण पंढरीच्या पांडुरंग मंदिराच्या खांबावर बुद्ध कोरलेले आहेत. पण तेथील बडव्यांनी डॉ आंबेडकरांच्या या दाव्यानंतर लगेच त्याला तांब्याचा पत्रा मारून ते बुद्ध झाकून टाकले. तो पत्रा उचकवला तर आजही ते बुद्ध पहायला मिळतात व ते मंदिर बुद्धविहार असल्याचा शोध लागतो. एवढेच काय यासाठीच डॉ.आंबेडकरांचा चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्या अगोदर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा सत्याग्रह करण्याचे मनात होते. या सर्व धार्मिक इतिहासाचे संताना व संत परंपरेला भान होते. त्यांचे प्रबोधन हे सत्यवादी होते. यात संत तुकारामांचा दर्जा फार वरचा होता. संत तुकारामांनी जसा बुद्ध कथन केला तसाच तो वारकरी संप्रदायाचा पाया घालणा-या संत नामदेवांनीही बौद्ध अवतारी आम्ही झालो संत | वर्णावया मात म्हणे नामा || असा गाऊन सांगितला. तर संत एकनाथांनी ‘ दार उघड बुद्धाई | बुद्धाई दार उघड || असा आईच्या रूपात सांगितला. तसेच संत जनाबाईंनी ‘ आठव्या अवतारी कंस वधियला | आता बुद्ध झाला सखा माझा || असा कृष्ण रूपात सांगितला. तर संत बहिनाबाईनी तर आपल्या गुरूला म्हणजे संत तुकारामांना कलियुगी हरी | बौद्धरूप धरी | तुकोबाशरीरी | प्रवेशला || असे सांगून संत तुकारामातच संपूर्ण बुद्ध पाहिला. या सर्व संतात संत तुकाराम बुद्धांच्या विचारांचे अनुकरण करण्यात फारच आघाडीवर होते. याचे कारण म्हणजे संत तुकारामांनी जी गाथा लिहिली तिच मुळात भंडारा डोंगराच्या मध्यावर असणाऱ्या बौद्ध भिक्खूंसाठी कोरलेल्या लेण्यात ( कपाटात) बसून शांत चित्ताने लिहिलेली आहे. तसेच संत तुकारामांचा पहिल्या इसवी सनाच्या शतकात होऊन गेलेले बौद्ध तत्ववेत्ते अश्वघोष यांच्या ‘ वज्रसूची ‘ या ग्रंथाचा मूळातून आभ्यास होता. म्हणून तर त्यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद करायला संत बहिणाबाईंना सांगितले होते व संत बहिनाबाईनी तो केलेला आहे. वज्रसूची या बौद्ध तत्त्वज्ञान ग्रंथाचा संत तुकारामांवर जबरदस्त प्रभाव होता. म्हणूनच त्यांच्या गाथेत बुद्धांवर आधारित अनेक अभंग सापडतात. एवढेच नाहीतर संत तुकारामांच्या गाथेतील हजारो अभंग हे बुद्ध विचारांसी तंतोतंत जूळणारे व साम्य दाखवणारे आहेत. इतका संत तुकारामांवर बुद्ध विचारांचा प्रभाव होता. बौद्ध अवतार माझिया अदृष्ठा | मौन्य मुखें निष्ठा धरियेली || ४१६०. १-४ || या अभंगात संत तुकाराम आपली बुद्धांवरची निष्ठा व्यक्त करतात. कारण तुकारामांना संत नामदेवांनी स्वप्नात येवून दृष्ठांत दिल्याचे स्वतः संत तुकारामांनीच एका अभंगात नमुद केलेले आहे. आणि तेच संत नामदेव बौद्ध अवतारी आम्ही झालो संत | वर्णावया मात म्हणे नामा || असे म्हणतात. म्हणजेच संत नामदेवांकडून सहस्र अभंग लिखानाचा बोध घेणारे संत तुकाराम व संत नामदेव यांचे बौद्ध विचार व निष्ठा एकच वाटते. एवढेच सांगून संत तुकाराम थांबत नाहीत तर ते ‘ कलीमाजी देव बौद्धरूप जाला | ४४४०, ३ || असे सांगतात. म्हणजेच बौद्धरूप हे माझ्या पहाण्यात नसले व ते मला अदृष्ट जरी असले तरी, माझा जन्म ज्या कलियुगात झाला त्या कलीयुगात माझा देव बुद्धच आहे, असे त्यांनी स्पष्ठच सांगितलेले आहे. म्हणजेच संत तुकाराम हे बुद्धरूपालाच विठ्ठल रूपात पहात होते व त्याची आराधना करत होते हे सिद्ध होते. एवढेच नाही तर बुद्धांनी त्रिशरणाचा महान संदेश आपल्या भिक्खू संघाला दिलेला आहे. त्रिशरण केल्याशिवाय बौद्ध धम्मात कोणत्याच धम्मविधीला सुरवात होत नाही. इतके बौद्ध धम्मात त्रिशरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. तोच धागा व विचार पकडून संत तुकाराम ‘ शरण शरण वाणी | शरण त्रिवाचा विनवणी || २५५२, १ || असे नम्रपणे कथन करतात व सरते शेवटी बुद्धालाच शरण जातात. तसेच संत तुकाराम ‘ तोडावया अवघ्या चेष्ठांचा संबंध | शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे || ९६८ . २ || असा शुद्ध होण्याचा मार्गच सांगतात. कारण शुद्ध होण्यासाठी शुद्ध करणारा माणूसही तेवढाच शुद्ध असावा लागतो. कारण दूस-याला शुद्ध करणे हे काही ‘ येरा गबाळ्याचे काम नाही. ‘ म्हणून संत तुकाराम बुद्धां सारखा माणसाला शुद्ध करणारे दूसरे कोणते दैवत नाही असे त्यांना स्पष्ट सांगायचे आहे व ते त्यांनी कधीच सांगून ठेवलेले आहे. यासाठीच त्यांनी माणसाला शुद्ध व निर्मळ करणारे जगात एकच दैवत आहे हे ‘ होते त्या निर्मळ शुद्ध बुद्ध || १४०७ . ४ || असे दुसऱ्यांदा सांगितले आहे. कारण ब-याच जनांना एखादी गोष्ट एकदा सांगून समजत नाही. त्यांचा मेंदू हलका असतो. म्हणून हे सत्य त्यांना एकदा नव्हे तर दोनदा म्हणजेच अनेकदा सांगावी लागते. म्हणून त्यांनी कोणाला शुद्ध व निर्मळ व्हायचे असेल तर बुद्धाकडूनच शुद्ध व्हा असे निक्षून सांगून, अंतिम सत्याला पूर्णविराम दिलेला आहे. कारण मार्गदाता सुद्धा ‘ आधी केले मग सांगितले ‘ या वृत्तीचा व सम्यक कर्माचाच असावा लागतो व तो मार्गदाता जगात फक्त बुद्धच आहे. दुसरा कोणी नाही.






