
जालना प्रतिनिधी
जालना : दि. १५ जून २०२६ अंबड तालुक्यातील गोंदी येथील सराईत वाळू तस्करावर महाराष्ट्र दरोडेखोर, गुंड व धोकादायक व्यक्ती तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या काळाबाजारास आळा घालणाऱ्या अधिनियम १९८१ (एमपीडीए) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
गोंदी (ता. अंबड, जि. जालना) येथील रहिवासी पंकज सखाराम सोळूंके (वय ३७ वर्षे) याला दिनांक १३ जून २०२६ रोजी रात्री जवाहर नगर पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर शहर हद्दीतून अटक करण्यात आली.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
सदर इसमाविरुद्ध वाळू चोरी, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकास मारहाण करून दुखापत करणे, अवैध वाळू वाहतूक, जीवे मारण्याची धमकी देणे तसेच रस्त्यात अडवून मारहाण करणे अशा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या; मात्र त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा न झाल्याने एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
स्थानबद्धतेस मंजुरी
झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगारी, धोकादायक व्यक्ती व वाळू तस्करीसारख्या विध्वंसक कृत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हादंडाधिकारी जालना यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. सदर प्रस्तावास दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी मंजुरी देण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे अटक
स्थानबद्धतेचा आदेश निघाल्यापासून गोंदी पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक पथक इसमाच्या मागावर होते. सराईत असल्याने तो वारंवार पसार होत होता. अखेर दिनांक १३ जून २०२६ रोजी गुप्त व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक पथक व गोंदी पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई तेगबीर सिंह संधू, विक्रम साळी व शिध्देश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि अमोल गुरले, पोलीस उपनिरीक्षक हारी जंगले, सहाय्यक फौजदार फुलचंद हजारे, तसेच पोलीस अधीक्षक पथकाचे सपोनि अविनाश गडाख, सहा. फौ. बरडे, पो. ह. कोकणे, जी. एम. हरबक, एन. टी. बकाल, व्ही. के. हळदे, एम. व्ही. बोराडे, सागर बाविस्कर, संदीप मान्टे यांनी सहभाग घेतला.
मध्यवर्ती कारागृहात दाखल
मा. जिल्हाधिकारी, जालना यांच्या आदेशानुसार स्थानबद्ध इसमास ०१ वर्षाच्या कालावधीसाठी मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई वाळू तस्करी व गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात पोलिसांच्या कठोर भूमिकेचे स्पष्ट उदाहरण ठरत असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.





