रामकिसन अवधूत
जालना प्रतिनिधी
जालना : दि. १० जून २०२६ जालना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या केंद्रप्रमुख भरती 2026 प्रक्रियेत खऱ्या आणि जन्मत: दिव्यांग उमेदवारास डावलून अपघातामुळे कमी टक्केवारीचे अपंगत्व असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून दिव्यांग हक्कांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या भरती प्रक्रियेत अशोक नारायणराव वराडे, रा. पारनेर तांडा, ता. अंबड, जि. जालना हे उमेदवार जन्मत: दिव्यांग असून त्यांच्याकडे अधिक टक्केवारीचे वैध दिव्यांग प्रमाणपत्र आहे. ते अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असून दिव्यांग कोट्यातून केंद्रप्रमुख पदासाठी पात्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मात्र, त्यांच्या प्रतिस्पर्धी गोविंद बाजीराव दराडे हे अपघातामुळे कमी प्रमाणात दिव्यांग असतानाही केंद्रप्रमुख भरती 2026 च्या अंतिम यादीत क्रमांक 1 वर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जन्मत: दिव्यांग असलेल्या वराडे यांना बाजूला सारण्यात आल्याचा आरोप होत आहे.
वराडे यांनी याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जालना यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “माझ्याकडे अधिक टक्केवारीचे दिव्यांग प्रमाणपत्र असताना आणि मी जन्मत: दिव्यांग असताना मला डावलणे हा सरळ अन्याय आहे,” असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनात पुढे त्यांनी मागणी केली आहे की, दोन्ही उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पुन्हा एकदा वैद्यकीय व शासकीय पातळीवर सखोल पडताळणी करण्यात यावी. योग्य निकष लावून न्याय्य निर्णय घ्यावा तसेच संबंधित केंद्रप्रमुख पदाची नियुक्ती आपल्यालाच देण्यात यावी.
या प्रकरणामुळे दिव्यांग आरक्षण धोरणाची अंमलबजावणी, प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आणि भरतीतील पारदर्शकता यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता शिक्षण विभाग या प्रकरणात काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





